आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सध्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लढत सुरु आहे. ही लढत सुरुवातीपासूनच रोमांचकारी होतेय. कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंजाब फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान, सलामीचा मयंक अग्रवाल सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या भानुका राजपक्षेने धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्याने दमदार फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला.
मैदानावर उतरल्यापासूनच राजपक्षे तळपला
सलामीला आलेला मयंक अग्रवाल उमेश यादवच्या चेंडूचा सामना करताना पायचित झाला. अवघी एक धाव करुन बाद झाल्यानंतर पंजावर चांगलाच दबाव आला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी भानुका राजपक्षे मैदानात आला. फलंदाजीसाठी येताच त्याने जोरदार फटकेबाजी सुरु केली. त्याने चौथ्या षटकात शिवम मावीला सळो की पळो करुन सोडले.
आधी चौकार नंतर तीन षटकार
शिवम मावीने पहिला चेंडू टाकताच चौकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर राजपक्षेने मोठे षटकार लगावले. एकानंतर एक असे तीन षटकार लगावल्यानंतर कोलकाताचे खेळाडू चांगलेच भेदरले. राजपक्षेने अवघ्या ०९ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि तीन षटकार यांच्या मदतीने तब्बल ३१ धावा केल्या. मात्र शिमव मावीने टाकलेल्या पाचव्या चेंडूचा सामना करताना राजपक्षे गोंधळला. जोराचा फटका मारण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र साऊथीने राजपक्षेचा झेल टिपल्यामुळे तो बाद झाला.
दरम्यान, दोन्ही संघांमध्ये सध्या अटीतटीची लढाई होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ पंजाबच्या धावा रोखण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पंजाबचे फलंदाज कोलकाताच्या गोलंदाजांना झोडपून काढत असून चौकार आणि षटकार लगावत मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करत आहेत.