बुधवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. पंजाब किंग्स इलेव्हनच्या संघाने दिलेलं १९९ धावांचं आव्हान मुंबईला जड गेलं आणि मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला. या मुंबईचा यंदाच्या पर्वातील सलग पाचवा पराभव आहे. मुंबईचा संघ सध्या पॉइण्ट टेबलमध्ये (IPL 2022 Points Table) तळाशी आहे. मुंबईने यापूर्वी इतकी वाईट कामगिरी कधीच केली नव्हती. त्यामुळेच या वाईट कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आता पाच वेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबईचा दादा संघ यंदा प्ले ऑफच्याआधीच बाहेर पडतो की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे. सध्या मुंबई प्लेऑफला जाऊ शकते की नाही याबद्दल सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा
विजय न मिळालेला एकमेव संघ…
आतापर्यंत जे सामने झाले आहे त्यामध्ये मुंबई हा एकमेव असा संघ आहे ज्याने एकही सामना जिंकला नाहीय. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर २३ धावांनी विजय मिळवून पॉइण्ट्स टेबलमधील नावासमोरचा भोपळा फोडलाय. चेन्नईच्या संघाचाही पहिल्या चार सामन्यांमध्ये सलग पराभव झाल्यानंतर त्यांना पहिला विजय मिळवता आलाय.
अव्वल चारमध्ये स्थान मिळणं कठीण…
आता मुंबईच्या प्ले ऑफबद्दलच्या संधीबद्दल बोलायचं झालं तर मुंबईला चत्मकारच करावा लागेल. यापूर्वीही मुंबईने अशापद्धतीचे चमत्कार करत प्ले ऑफमध्ये धडक मारल्याने चाहत्यांना रोहितच्या संघाकडून अपेक्षा कायम आहेत. मात्र या चमत्काराची वाट पाहणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांसाठी आताच्या स्थितीला एक आनंदाची आणि वाईट बातमी आहे. चांगली बातमी अशी की असाच चमत्कार मुंबईने २०१५ मध्ये करुन दाखवला होता. तर वाईट बातमी अशी की आताचं आयपीएल हे १० संघांमध्ये खेळवलं जात असून त्यापैकी चारच संघ खेळवले जाणार असल्याने गटांनुसार अंकांचं गणित आणि आकडेमोड पाहता अव्वल चारमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला स्थान मिळणं कठीण दिसत आहे.
दहा संघ असल्याने अडचण…
उदाहरणच द्यायचं झालं तर २०११ च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळवण्यात आले होते तेव्हा प्रत्येक संघ १४ सामने खेलला होता. त्यावेळेच प्ले ऑफला पात्र ठरलेल्या चौथ्या संघाचे एकूण १६ गुण होते. तर १४ गुण असणारे संघ पात्र ठरले नव्हते.
आठ संघ खेळवण्यात आलेल्या पर्वांमध्ये १४ गुणांसहीत संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेले. मात्र यंदा असं होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. २०११ नुसार हिशेब लावला तर अव्वल चारमध्ये पात्र ठरण्यासाठी संघांना किमान १६ गुण आवश्यक आहेत.
आठ विजय आवश्यक
आता हीच आकडेमोड लक्षात घेतल्यास आता मुंबईला त्यांच्या उरलेल्या नऊ सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. मात्र असं झालं नाही तर मुंबईला प्ले ऑफच्या आशा सोडून द्याव्या लागतील. मात्र मुंबईसाठी आणि संघाच्या चाहत्यांसाठी एकमेव चांगली गोष्टमध्ये यापूर्वीही मुंबईचा संघ अशा परिस्थितीमधून बाहेर येत थेट जेतेपदापर्यंत पोहचला होता.
आधीही केलाय असा पराक्रम…
२०१५ मध्ये मुंबईने त्यांच्या पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने गमावले होते. त्यानंतर पुढील आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकत त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर थेट जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र ते पर्व आठ संघांचं होतं आणि हे पर्व १० संघांमध्ये खेलवलं जात आहे. त्यामुळेच आता नऊ पैकी सात सामने जिंकून मुंबईला अव्वल चारमध्ये स्थान मिळवणं कठीण असेल.
अगदी थोड्यात सांगायचं झाल्यास…
अगदी थोड्यात सांगायचं झालं तर मुंबईला आता उर्वरित नऊ सामन्यांपैकी केवळ एक सामना गमवण्याची मूभा असून नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने किमान आठ सामने जिंकावे लागणार आहेत. तरच मुंबई प्ले ऑफमध्ये खेळू शकेल.