आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती मोठ्या रंगतदार आणि अटीतटीच्या होत आहेत. या हंगामात राजस्थान रॉयल्स या संघाने तर आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित करुन टाकले आहे. तीनपैकी दोन सामने जिंकून हा संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी आहे. काल (बुधवार) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. पराभवाचे शल्य अजूनही ताजे असताना आता या संघाला आणखी मोठा झटका बसला आहे. राजस्थानचा दिग्गज गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल जखमी झाल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा >>> Video : विराट कोहली झाला धावबाद, महिला चाहतीला भावना अनावर, स्टेडियममधील व्हिडीओ व्हायरल
नॅथन कुल्टर-नाईल हा राजस्थान संघातील अव्वल गोलंदाज आहे. अटीतटीच्या वेळी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता त्याच्यात आहे. मात्र सनरायझर्स हैदरबादसोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात नॅथन कुल्टर-नाईलला दुखापत झाली. हा सामना राजस्थानने ६१ धावांनी जिंकला होता. मात्र नाईलला झालेली दुखापत लवकर भरुन न येणारी असल्यामुळे त्याला आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे. राजस्थान रॉयल्स आपल्या खेळाडूंच्या मदतीने मोठी घोडदौड करतोय. हा संघ सध्या गुणतालिकेत सर्वात वरच्या स्थानावर आहे. मात्र असे असताना नॅथन कुल्टर-नाईलसारखा खेळाडू संघातून बाहेर पडल्यामुळे त्याचा मोठा फटका आता राजस्थानला बसणार आहे.
हेही वाचा >>> सामना गमावला तरी बटलरने केली कमाल, आयपीएलच्या इतिहासात ‘असा’ विक्रम रचणारा ठरला पहिलाच खेळाडू
नॅथन कुल्टर-नाईल स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची माहिती राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर दिलेली आहे. राजस्थान रॉयल्सने नाईलला दोन कोटी रुपये देऊन खरेदी केले होते. त्यानंतर नाईलने राजस्थानच्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजी केली होती. तो या समन्यात एकही बळी घेऊ शकला नव्हता. त्याने चार षटकांत ४८ धावा दिल्या होत्या. दरम्यान, नाईलची जागा आता कोणता खेळाडू घेणार हे राजस्थानने अद्याप सांगितलेले नाही.