इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) आजपासून सुरुवात होतेय. या स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ २९ मार्च रोजी पुण्यामधील सामन्यात सन रायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानात उतरत सिझनचा श्रीगणेशा करणार आहे. पहिल्याच वर्षी आयपीएल जिंकलेला राजस्थानचा संघ पुन्हा एकदा चषकावर आपलं नाव कोरण्याच्या इच्छेनेच यंदाची स्पर्धा खेळणार आहे. मात्र असं असताना एका नकोश्या कारणासाठी सध्या या संघाचं नाव समोर आलंय. कर्णधार संजू सॅमसनने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर संघानं आपल्या संपूर्ण सोशल मीडिया टीमला नोकरीवरुन काढून टाकलं आहे.

राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटवरुन संजूने नाराजी व्यक्त केल्यानंतर राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संघाच्या बसमध्ये आराम करतानाच फोटो ट्विटवरुन पोस्ट करण्यात आलेला. मात्र हा फोटो पोस्ट करताना राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया टीमने त्यात एडीटींग करुन संजूला एका मुलीच्या अवतारामध्ये दाखवत, “क्या खूब लगते हो” अशी कॅप्शन दिली.

मात्र संजूने या फोटोबद्दल थेट ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. त्याने सोशल मीडियावर संघांनी जास्त जबाबदारपणे वागलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. “मित्रांनी असं काही केलं तर चालतं पण संघांनी अधिक प्रोफेश्नल रहायला हवं,” असं म्हणत संजूने हा फोटो रिट्विट केला. संजूला यासारख्याचं एवढं वाईट वाटलं की त्याने ट्विटरवरुन राजस्थान रॉयल्सच्या अकाऊंटला अनफॉलो केलं.

राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने तातडीने या नाराजीची दखल घेत सोशल मीडिया संभाळणाऱ्या संपूर्ण टीमला कामावरुन काढून टाकलं. त्यांनी लवकरच नवीन सोशल मीडिया टीम संघासाठी काम करेल, असं सांगण्यात आलंय. “आज घडलेल्या प्रकारानंतर आम्ही सोशल मीडिया टीममध्ये बदल करत आहोत. हैदराबादविरुद्धच्या सामन्या आधी संघामध्ये सर्वकाही सुरळीत सुरु आहे. व्यवस्थापनाकडून आपल्या डिजीटल धोरणांबद्दल सविस्तर विचार केला जाईल आणि नवीन टीमला नियुक्त करण्यात येईल,” असं राजस्थानच्या संघाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलंय.

“यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये चाहत्यांना या अकाऊंटवरुन सातत्याने अपडेट्सची अपेक्षा असणार याची जाणीव आम्हाला आहे. सध्या आम्ही यावर एक तात्पुरतं उत्तर शोधलंय,” असंही संघ व्यवस्थापनाने म्हटलंय.