आयपीएलच्या १५ व्या हंगामाला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. यावेळी दोन संघ वाढल्यामुळे चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, २००८ मध्ये जेतेपदावर नाव कोरणारा राजस्थान रॉयल्स हा संघ यावेळी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राजस्थान रॉयल्सकडे अनुभवी फलंदाज आणि मातब्बर गोलंदाज असल्यामुळे यावेळी हा संघ फायनलपर्यंत जाऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला जातोय.
यावेळी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅम्सनकडे आहे. राजस्थानने यावेळी संजू सॅम्सन तसे जोस बटलर आणि यशस्वी जैसवाल यांना रिटेन केलंय. तर दुसरीकडे जोफ्रा आर्चर आणि बेन टोक्ससारख्या खेळाडूंना संघाने मुक्त केलेलं आहे. आर्चर आणि टोक्सच्या बदल्यात राजस्थानने यावेळी फलंदाजी मजबूत करण्याकडे लक्ष दिलं असून अनेक फलंदाजांना संघात समाविष्ट केलं आहे. राजस्थानने यावेळी आर अश्विन तसेच युजवेंद्र चहल यांच्यासारख्या फिरकीपटूंना संघात स्थान दिले आहे. हे दोन्ही खेळाडू संघासाठी जमेची बाजू ठरतील. राजस्थानकडे यावेळी वेगवान गोलंदाजांचाही चांगला ऑप्शन आहे. प्रसिद्ध कृष्णा तसेच ट्रेंट बोल्ट सारखे गोलंदाज राजस्थानकडे आहेत.
राजस्थान रॉयल्सकडे फलंदाजांची मोठी फळी आहे. हेटमायर आणि जेम्स निशाम हे दोन फलंदाज राजस्थानला मोठी धावसंख्या करण्यामध्ये चांगली मदत करु शकतात. मात्र या दोन खेळाडूंनंतर मैदानावर सातत्यपूर्ण खेळ करणारा खेळाडू राजस्थानकडे नाही. ही कमी बटलर आणि सॅम्सन यांच्या माध्यमातून भरून काढली जाऊ शकते. हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यावर संघाची पूर्ण जबाबदारी रियान पराग किंवा आर. अश्विनवर येणारअसून संघाला चांगली धावसंख्या करुन देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
राजस्थान रॉयल्स आपला पहिला सामना २९ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरोधात पुण्याच्या मैदानात खेळणार आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ
फलंदाज: देवदत्त पडिक्कल, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर (परदेशी), रॅसी व्हॅन डर डुसेन, करुण नायर
यष्टिरक्षक: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, ध्रुव ज्यूरेल
अष्टपैलू खेळाडू: रियान पराग, रविचंद्रन अश्विन, जेम्स निशाम , डॅरिल मिशेल (परदेशी), अनुनय सिंग, शुभम गढवाल
वेगवान गोलंदाज: प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, कुलदीप यादव, नॅथन कुल्टर-नाईल, कुलदीप सेन, ओबेद मॅकॉय
फिरकीपटू: युजवेंद्र चहल, के.सी. करिअप्पा, तेजस बरोका