आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच सुरुवात झाली आहे. या हंगामात दोन संघ वाढले असल्यामुळे प्रत्येक सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. काही संघांना नवे कर्णधार मिळाल्यामुळे फलंदाजी तसेच गोलंदाजीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी कर्णधार तथा फायर ब्रँड फलंदाज विराट कोहलीबाबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. या हंगामात कोहली ऑरेंज कॅप नक्की मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मात्र त्यासाठी त्यांनी एक अटक घातली आहे.
विराट कोहली या हंगामात बंगळुरुकडून सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरला तर तो नक्की ऑरेंज कॅप पकावेल, असं रवी शास्त्री यांनी म्हटलंय. तसेच विराट कोहलीला सलमीला येण्याची संधी दिली जाईल का ? याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलंय. “कोहलीला प्रथम क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाईल की तो तिसऱ्या क्रमांकावर येईल, हे सर्व टीमच्या कॉम्बिनेशनवर अवलंबून असेल. टीमच्या संतुलनावर ते अवलंबून असेल. टीममध्ये मधल्या फळीमध्ये चांगले फलंदाज असतील तर विराटला सलामीला येण्याची संधी दिली जाऊ शकते,” असे शास्त्री म्हणाले.
२०१६ च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याने फलंदाजीसाठी सलामीला येत पूर्ण हंगामात एकूण ९७३ धावा केल्या होत्या. या हंगामात त्याने ऑरेंज कॅप पटकावली होती. कदाचित याच कारणामुळे रवी शास्त्री यांनी विराटला सलामीला येण्याची संधी दिली तर तो नक्की ऑरेंज कॅप मिळवेल, असे भाकित केले आहे.
दरम्यान, बंगळुरु आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरुला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरुने दिलेल्या २०६ धावांचे लक्ष्य दिल्लीने लिलया पेलले. या सामन्यातही विराटने चांगली कामगिरी केली होती.