आयपीएलच्या १५ वा हंगाम चांगलाच चुरशीचा झाला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी केलेली जादू तसेच फलंदाजांनी संयम राखून केलेली फलंदाजी यामुळे बंगळुरुने कोलकातावर तीन गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य सहज गाठता येईल असे वाटत असले तरी या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुची चांगलीच दमछाक झाली. कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटपर्यंत लढत दिल्यामुळे आजचा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. मात्र शेवटी विजय संपादन करत बंगळुरुने या हंगामातील पहिला विजय नोंदवला. बंगळुरुच्या या विजयासाठी फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
बंगळुरुचा १५ व्या हंगामातील पहिला विजय
कोलकाताने दिलेले १२९ धावांचे लक्ष गाठण्यासाठी उतरलेल्या बंगळुरु संघाची सुरुवातीला चांगलीच धांदल उडाली. सलामीचे फलंदाजी फाफ डू प्लेलिस (५), अनुज रावत (०) बाद झाल्यामुळे सर्व जबाबदारी विराटवर येऊन पडली. मात्र विराटनेही सर्वांची निराशा केली. तो उमेशने टाकलेल्या चेंडूवर अवघ्या १२ धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर मात्र कोलकाताने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी बंगळुरुला मोठी कसरत करावी लागली. डेविड वेली (१८), रुदरफोर्ड (२८) शाहबाज अहमद (२७) यांनी संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर सामना पूर्णपणे फिरला. बंगळुरुच्या हातातून सामना जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी जबाबदारीने खेळत शेवटच्या क्षणी अनुक्रमे १४ आणि १० धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुला आज या हंगामातील पहिला विजय मिळवता आला.
गोलंदाजांनी कोलकोताला रोखून धरलं
याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी धडाकेबाज कामगिरी करत योग्य ठरवला. यामध्ये तीन वर्षे क्रिकेटपासून दूर राहणारा आकाश दीप यांने तर नेत्रदीपक कामगिरी केलीय. त्याने चार षटकात ४५ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे कोलकाताच्या धावसंख्येला ब्रेक लागला.
आकाश दीप, हसरंगाने केली धमाकेदार गोलंदाजी
सामन्याच्या सुरुवातीला चौथे षटक सुरु असताना आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला अवघ्या दहा धावांवर बाद केले. या मोठ्या झटक्यामुळे कोलकाता संघ चांगलाच भेदरला. सिराज अहमदने टाकलेल्या चेंडूवर रहाणेने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ९ धावांवर झेलबाद झाला. आकाश दीपने हा झेल पकडला. त्यानंतर कोलकाता संघ ४४ धावांवर असताना आकाश दीपने नितिश राणाचा बळी घेतला. राणा अवघ्या दहा धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र हसरंगाने त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या १३ धावांवर बाद केले.
कोलकाताची स्थिती ६७ धावांवर सहा गडी बाद
त्यापाठोपाठ कोलकाता संघ ६७ धावांवर असताना हसरंगाने नरेनला १२ धावांवर तंबुत पाठवले. हसरंगाने दोन बळी घेतल्यानंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर पाच गडी बाद अशी झाली. त्यापाठोपाठ हसरंगाने लगेच जॅक्सनचा त्रिफळा उडवला. या बळीनंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर सहा गडी बाद अशी झाली.
उमेश आणि वरुण चक्रवर्तीने शेवटी धावा करण्याचा केला प्रयत्न
हसरंगानंतर कोलकाताला रोखण्याची जबाबदारी हर्षल पटेलने घेतली. पटेलने बिलिंग्स (१४), रसेल (२५) या दोन फलंदाजांना बाद केले. शेवटी टिम साउथी मैदानावर टीकू शकला नाही. त्याला हसरंगाना शून्यावर बाद केले. त्यानंतर मात्र उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न केला. उमेशने १८ धावा आणि चक्रवर्तीने (नाबाद) १० घावा केल्यामुळे कोलकाता संघ १२८ धावा करु शकला.