आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५४ व्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादवर ६७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळुरुने दिलेले १९३ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादची पुरती दमछाक झाली. पूर्ण गडी बाद होईपर्यंत हैदराबादला १२५ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरुच्या विजयासाठी वनिंदू हसरंगाने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने पाच बळी घेतल्याने बंगळुरुला विजायपर्यंत पोहोचता आले. तर फलंदाजीमध्ये फॅफ डू प्लेसिसने अर्धशतकी खेळी केल्यामुळे बंगळुरु संघाला हैदराबादसमोर १९२ धावांचा डोंगर उभा करता आला.
हेही वाचा >>> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादची दमछाक झाली. सनरायझर्स हैदराबादला पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. सलामीला आलेले अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन शून्यावर बाद झाले. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या राहुल त्रिपाठीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतकी खेळी करत ३७ चेंडूंवर ५८ धावा केल्या. राहुल त्रिपाठी वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
हेही वाचा >>> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल
बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर हैदराबादचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. मधल्या फळीतील ऐडन मर्कराम (२१), निकोलस पूरन (१९) यांनी समाधानकारक खेळी केली. त्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला १० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. १०४ पासून १२५ धावांपर्यंत पोहोचताना हैदराबादचे सहा फलंदाज बाद झाले. जगदिशा सूचित (२), शशांक सिंग (८), कार्तिक त्यागी (०), भुवनेश्वर कुमार (८), उमरान मलिक (०), फझलहक फारुकी (२ नाबाद) यांनी निराशा केली.
हेही वाचा >>> राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?
याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या संघाची खराब सुरुवात झाली. पहिल्याच षटकात पहिल्या चेंडूवर सलामीला आलेला विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. त्याला खातंदेखील खोलता आलं नाही. कोहली बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या रजत पाटीदारने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ३८ चेंडूंमध्ये ४८ धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ
तर सलामीला आलेल्या फॅफ डू प्लेसिसनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत ५० चेंडूंमध्ये ७३ धावा केल्या. आठ चौकार आणि दोन षटकार यांच्या जोरावर त्याने ही किमया साधली. ग्लेन मॅक्सवेलनेही ३३ धावा केल्या. दिनेश कार्तिकने तर चौकार आणि षटकार यांचा पाऊस पाडत फक्त आठ चेंडूंमध्ये चार षटकार आणि एक चौकार लगावत ३० धावा केल्या. कार्तिकने शेवटी आक्रमक खेळी केल्यामुळे बंगळुरु संघाने १९२ धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा >>> युद्धस्थितीमुळे रशियाच्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा देशत्याग!
गोलंदाजी विभागात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने मोठी कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने सलामीला आलेल्या हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन (धावाबाद) या जोडीला पहिल्याच षटका शून्यावर बाद केलं. तर वनिंदू हसरंगाने दिमाखदार कामगिरी करत पाच विकेट्स घेत बंगळुरुला विजय मिळवून दिला. त्याने ऐडन मर्कराम, निकोलस पूरन, जगदिशा सूचित, शशांक सिंग आणि उमरान मलिक यांना बाद केलं. जोस हेझलवूडने दोन बळी घेतले.