आयपीएलचा १५वा हंगाम अनेक युवा खेळाडूंसाठी चांगलाच ठरला आहे. या हंगामात अनेक खेळाडूंनी आपला फॉर्म शोधण्यात यश मिळवले आहे, तर इतरांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, या हंगामात काही युवा खेळाडू खराब फॉर्ममधून जात आहेत. पण काही खेळाडूंनी मर्यादित संधी मिळूनही आपली छाप सोडली आहे. अभिषेक शर्मा, उमरान मलिक, तिलक वर्मा, कुलदीप यादव, मोहसीन खान, मुकेश चौधरी या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या यादीत कोलकाता नाईट रायडर्सची स्टार फलंदाज रिंकू सिंगचे नावही जोडले गेले आहे. कोलकाता नाईट रायडर्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध २३ चेंडूत ४२ धावांच्या नाबाद खेळीमध्ये सात गडी राखून विजय मिळवून देण्यात रिंकूने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर फलंदाज रिंकू सिंग म्हणाला की, मी अशा संधीची पाच वर्षांपासून वाट पाहत होतो. केकेआरने १५३ धावांचे लक्ष्य १९.१ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आयपीएल २०२२ मध्ये पाच सामन्यांच्या पराभवानंतर, कोलकाताने हा विजय मिळवला आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर २४ वर्षीय रिंकू सिंग खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आला. त्याने ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. रिंकूच्या खेळीत सहा चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान त्याला एकदाही असे वाटले नाही की तो संघर्ष करत आहे. राजस्थानकडे युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णासारखे आंतरराष्ट्रीय गोलंदाज आहेत, पण रिंकूने या सर्वांचा सामना केला. यापूर्वी क्षेत्ररक्षणातही त्याने दोन झेल घेतले होते. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
१२ ऑक्टोबर १९९७ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ,येथे जन्मलेल्या रिंकू सिंगची क्रिकेटची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. रिंकू पाच भावंडांमध्ये तिसरा आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर पोहचवचे काम करायचे. रिंकू सिंगचा एक भाऊ रिक्षा चालवायचा आणि दुसरा कोचिंग सेंटरमध्ये काम करायचा. रिंकू सिंग नववीत नापास झाला होती. जास्त न शिक्षण नसल्यामुळे रिंकूला चांगली नोकरी मिळत नव्हती. रिंकूने भावाकडून नोकरी लावून देण्यास सांगितले. त्यानंतर त्याचा भाऊ त्याला जिथे घेऊन गेला तिथे त्याला झाडू मारण्याचे काम मिळत होते.
रिंकू सिंगला झाडू मारण्याचे काम मिळाले, पण त्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी झाला. २०१५ मध्ये त्यांच्या कुटुंबावर पाच लाखांचे कर्ज झाले होते. उत्तर प्रदेश १९ वर्षाखालील संघासाठी खेळण्यासाठी मिळालेल्या तुटपुंज्या दैनिक भत्त्याने आणि इतर क्रिकेटच्या पैशातून त्याने कुटुंबाचे कर्ज फेडले. २०१७ च्या आयपीएल लिलावात रिंकूला पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ८० लाखांना खरेदी केले. यंदाच्या लिलावात रिंकूला ५५ लाख रुपये मिळाले. आतापर्यंत फक्त आयपीएलमध्येच त्याच्या क्षेत्ररक्षणाच्या चर्चा होत्या. मात्र आता रिंकूने फलंदाजीने चमत्कार करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
रिंकू सिंगने २०१४ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. २०१९ मध्ये रिंकू सिंग परवानगीशिवाय क्रिकेट खेळण्यासाठी अबुधाबीला पोहोचला होता. येथे त्याने परवानगीशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये भाग घेतला. यानंतर बीसीसीआयने रिंकू सिंगला ३ महिन्यांसाठी निलंबित केले.