इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. २० व्या षटकामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला ३६ धावांची गरज होती. म्हणजेच सहा चेंडूंमध्ये सहा षटकारांची आवश्यकता दिल्लीच्या संघाला होती. वेस्ट इंडिजचा रोवमेन पॉवेल हा फलंदाजी करत होता. विशेष म्हणजे आपल्याच राष्ट्रीय संघातील ओबेड मकॉयच्या गोंलदाजीवर शेवटच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार पॉवेलने लगावले. मात्र त्यानंतर जे घडलं त्यामुळे दिल्लीने सामना गमावला आणि त्यासाठी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत जबाबदार असल्याचा दावा केला जातोय.

झालं असं की, शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूंवर पॉवेलने षटकार लगावला. मात्र या षटकारानंतर मैदानात एक वाद झाला. हा चेंडू उंचीला फलंदाजाच्या कंबरेच्या वर असल्याने तो नो बॉल आहे की नाही यावरुन वाद झाला. सुरुवातीला हा नो बॉल असल्याचं वाटत होतं. मात्र मैदानावरील पंचांनी नो बॉल देण्यास नकार दिला. मात्र यामुळे नाराज झालेल्या ऋषभ पंतने मैदानातच विचित्र भूमिका घेतली. चेंडूची उंची पाहता तो नो बॉल असायला हवा होता असं पंतचं मत होतं.

पंत एवढा नाराज होता की त्याने रागात दिल्ली कॅपिटल्सच्या दोन्ही फलंदाजांना सामना सोडून मैदानाबाहेर येण्यास सांगितलं. दिल्लीचे प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी मैदानात धाव घेतली. त्यांनी पंचांना चेंडू नो बॉल असल्याचं मैदानात येऊन सांगितलं. यंदाच्या आयपीएलमधील हा अशाप्रकारचा पहिलाच वाद ठरलाय. मात्र दिल्लीच्या संघातील अन्य प्रशिक्षकांनी पंतला शांत करत सामना सुरु ठेवण्यासाठी मध्यस्थी केली.

पंत हा पंचांच्या निर्णयावर नाराज होता. त्याने पंचांच्या निर्णयावर सडकून टीका केली. मात्र पंतने घेतलेल्या भूमिकेमुळे पॉवेलला गवसलेली लय तो गमावून बसला आणि दिल्लीने सामनाही गमावला. दिल्लीने हा सामना १५ धावांनी गमावला.

Story img Loader