इंडियन प्रीमियर लीग २००८ मध्ये सुरु झाल्यापासून जगातील सर्वात मोठी टी२० लीग बनली आहे. आयपीएलमध्ये पाकिस्तान वगळता जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना पहिल्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली होती. नोव्हेंबर २००८ मध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाकरण्यात आली. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू यासिर अराफतने अलीकडेच खुलासा केला आहे की, त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून लीगमध्ये खेळण्याची ऑफर मिळाली होती.

यासिर अराफतने त्याच्या यूट्यूब चॅनेल क्रिकेट डेनवर सांगितले की कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने त्याला वैयक्तिकरित्या त्याच्या फ्रेंचायझीमध्ये सामील होण्यासाठी ऑफर दिली होती. “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) पहिल्या हंगामासाठी खेळाडूंची निवड केली होती आणि दुर्दैवाने मी त्यात नव्हतो. त्यामुळे मी स्पर्धेत खेळू शकलो नाही,” असे अराफत म्हणाला.

“मी २००८ मध्ये केंटसाठी कौंटी क्रिकेट खेळत होतो, जिथे केकेआरची स्काउटिंग संघ खास भारतातून आली होती. स्काउटिंग संघ मला एका सामन्यादरम्यान भेटली. संघातील सदस्यांनी मला सांगितले की शाहरुख खानची इच्छा आहे की मी त्याच्यासाठी खेळावे. सुरुवातीला मला वाटले की हा विनोद आहे.शाहरुखने कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलण्यासाठी कोणाला का पाठवले?त्यांनी मला कार्ड दिले आणि माझा नंबर घेतला, असे अराफत पुढे म्हणाला.

“काही आठवड्यांनंतर मला त्याच्यासोबत संपर्क न केल्याची तक्रार करणारा एक ईमेल आला. त्याने मला पुन्हा तीन वर्षांच्या कराराची ऑफर दिली, जिथे शाहरुखने स्वत: फोन करून माझे स्वागत केले. काही दिवसांनंतर, मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि पाकिस्तानी खेळाडू पुन्हा या स्पर्धेचा भाग होऊ शकले नाहीत. मी आणि इतर पाकिस्तानी खेळाडू पुन्हा कधीही आयपीएलमध्ये खेळलेलो नाही हा कदाचित नशिबाचा आहे,” असे यासिर अराफतने म्हटले.

२००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, अराफतने तीन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने ९४ धावा केल्या आणि नऊ विकेट घेतल्या. अरफातने ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७४ धावा केल्या आणि चार विकेट घेतल्या. १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये अराफातने ९२ धावा केल्या आणि १६ विकेट घेतल्या.