आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच लढती अटीतटीच्या होत आहेत. या हंगामात पहिल्यांदाच पदार्पण करणारे खेळाडूदेखील चांगलेच चमकत आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये असे अनेक खेळाडू आहे ज्यांनी या हंगामात दिग्गजांना मागे टाकलंय. गुजरात टायटन्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यामध्ये हैदराबादचा शशांक सिंगदेखील चांगलाच तळपला. सहाव्या विकेटसाठी मैदानावर येत त्याने पदार्पणातच अवघ्या सहा चेंडूंमध्ये नाबाद २५ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे या सहा चेंडूंमध्ये त्याने षटकारांची हॅटट्रिक केली आहे.
हेही वाचा >>> राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली, आपल्या पहिल्या कॅप्टनसाठी सर्व खेळाडू परिधान करणार खास जर्सी
सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबाद संघाने गुजरातसमोर १९५ धावांचे आव्हान उभे केले. या डावात कर्णधार केन विल्यम्सन फक्त पाच धावा करु शकला. तर अभिषेक शर्माने अर्धशतकी खेळी करत ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. त्यानंतर ऐडन मर्कराम वगळता मधल्या फळीतील फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाहीत. मात्र शेवटच्या षटकांत फलंदाजीसाठी आलेल्या शशांक सिंगने कमाल केली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने फक्त सहा चेंडूंचा सामना केला. या सहा चेंडूंमध्ये त्याने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने तीन चेंडूंमध्ये सलग तीन षटकार लगावले. तसेच एक चौकार आणि अन्य तीन धावांच्या मदतीने त्याने अवघ्या सहा चेंडूंमध्ये एकूण २५ धावा केल्या. पदार्पणातच मोठे फटके लगावत त्याने सर्वांचा आश्चर्यचकित करुन टाकलं. त्याच्या याच खेळाची सगळीकडे चर्चा केली जात आहे.
हेही वाचा >>> Video : मोहम्मद शमीच्या चेंडूवर हैदराबादचा कॅप्टन क्लीन बोल्ड, परफेक्ट गोलंदाजीचा व्हिडीओ पाहाच
दरम्यान, सुरुवातीला फलंदाजीसाठी येत हैदराबादने गुजरतसमोर विजयासाठी १९६ धावांचे लक्ष्य ठेवले. मधल्या फळीतील निकोलस पूरन, वॉशिंग्टन सुंदर चांगली कामगिरी करु शकले नाहीत. दोघांनीही तीन-तीन धावा केल्या. मर्कराम आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे हैदराबादला १९५ धावांपर्यंत पोहोचता आलं.