आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील हैदराबाद आणि लखनऊ यांच्यातील आजची लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र लखनऊने दिलेले १७० धावांचे लक्ष्य हैदराबादला गाठता आले नाही. परिणामी लखनऊचा १२ धावांनी विजय झाला. या विजयासाठी लखनऊच्या गोलंदाजांनी मोठी मेहनत घेतली. आवेश खानने तब्बल ४ बळी घेत हैदराबाद संघाला खिळखिळं केलं. तर शेवटच्या षटकात जेसन होल्डरने आश्चर्यकारक गोलंदाजी करत सहा चेंडूंमध्ये हैदराबादच्या तीन फलंदाजांना बाद केलं. लखनऊच्या या विजयासाठी कर्णधार राहुलने केलेल्या ६८ धावांची खूप मदत झाली.
लखनऊने दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन सलामीला आले. मात्र ही जोडी मैदानावर जास्त काळ टिकू शकली नाही. दुसऱ्या षटकातच कर्णधार केन विल्यम्सनचा आवेश खानने बळी घेतला. फटका मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंडू अँड्र्यूच्या हातामध्ये विसावल्यामुळे विल्यम्सन अवघ्या १६ धावा करुन झेलबाद झाला.
अभिषेक शर्मादेखील १३ धावांवर आवेश खानच्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर लागोपाठ मर्करामही झेलबाद झाला. एडन मर्करामने १४ चेंडूमध्ये १२ धावा केल्या. कृणाल पांड्याने टाकलेल्या चेडूवर मर्करामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. के एल राहुलने अप्रतिम झेल टिपल्यामुळे मर्कराम १२ धावांवर बाद झाला.
हेही वाचा >>> IPL 2022 : पहिल्या सामन्यात शून्यावर बाद, आता मात्र धावांचा पाऊस, वन मॅन आर्मी केएल राहुलची धडाकेबाज फलंदाजी
दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या राहुल त्रिपाठीने डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. मोठे फटके मारत त्रिपाठीने १७० धावांकडे वाटचाल केली होती. मात्र मात्र कृणाल पांड्याने त्याचा बळी घेतला. ४४ धावांवर असताना त्रिपाठी झेलबाद झाला. त्रिपाठीने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्रिपाठीनंतर निकोलस पुरनने संयम राखत फलंदाजी केली. तसेच संधी मिळताच तो मोठे फटके मारत धावा चोरत होता. मात्र ३४ धावांवर असताना आवेश खानच्या चेंडूवर पुरन झेलबाद झाला. त्यानंतर मात्र हैदराबादचा बुरुज ढासळत गेला. पुरननंतर पुढच्याच चेंडूमध्ये अब्दुल समद खातं न खोलता झेलबाद झाला. या बळीनंतर सामना लखनऊच्या बाजूने फिरला.
समद बाद झाल्यानंतर शेवटच्या दोन षटकांत २६ धावांची गरज हैदराबादला होती. मात्र शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर झेसबाद झाल्यानंतर हैदराबादच्या आशा मावळल्या. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर भावेश कुमारही झेलबाद झाला. त्यामुळे सामना पूर्णपणे लखनऊनच्या खात्यात गेला. शेवटी हैदराबादला १७० धावाचे लक्ष्य गाठता आले नाही. हैदराबादचा १२ धावांनी पराभव झाला.
हेही वाचा >>> आयपीएल सुरु असताना आकाश चोप्राने केली अजब मागणी, युजवेंद्र चहलने दिल्ला भन्नाट रिप्लाय, म्हणाला..
यापूर्वी नाणेफेक जिंकल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात सलामीला आलेला क्विटंन डिकॉक फक्त एक धाव करुन बाद झाला. त्यानंतर लखनऊ संघ १६ धावांवर असताना एविन लुईस फक्त एक धाव करुन तंबुत परतला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी आलेला मनिष पांड्यादेखील चांगली फलंदाजी करु शकला नाही. मनिष ११ धावांवर बाद झाला.
मात्र चौथ्या विकेटसाठी फलंदाजीला उतरलेल्या दीपक हुडाने शानदार खेळ केला. त्याने ३३ धावांत तीन षटकार आणि तीन चौकार यांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळ केला. तर दुसरीकडे फलंदाजीसाठी आलेला केएल राहुलने मैदानात घट्ट पाय रोवले होते. दीपक हुडा आणि केएल राहुल या जोडीने चांगली फलंदाजी करत लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. लखनऊ संघ ११४ धावसंख्येवर असताना दीपक हुडा ५१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर संघाची १४४ धावसंख्या असताना केएल राहुल ६० धावांवर पायचित झाला.
हेही वाचा >>> पंजाबने सामना जिंकला, पण मैदानात चेन्नईच्या धोनीची चर्चा, रचला ‘हा’ नवा विक्रम
केएल राहुल बाद झाल्यानंतर मात्र लखनऊचा संघ दोनशेपेक्षा जास्त धावा करु शकणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. कृणाल पांड्या नटराजनच्या चेंडूवर बाद झाला. मात्र शेवटच्या क्षणी आयुष बदोनी आणि जासन होल्डर ही जोडी चौकार आणि षटकार लगावत लखनऊला १६९ धावसंख्येपर्यंत घेऊन गेली.
हैदराबादच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर आज भुवनेश्वर कुमारला एकही बळी घेता आला नाही. तर वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत २८ धावा देत क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस यांचा बळी घेतला. रोमॅरियो शेफर्ड चार षटकांत ४२ धावा देत दोन फलंदाजांना बाद केलं. तर टी नटराजनने ४ षटकांत २६ धावा देत केएल राहुल आणि कृणाल पांड्या यांना तंबुत परत पाठवलं. भुवनेश्वर कुमारसोबत उमरान मलिक, अब्दुल समद यांना एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही. त्यांनी अनुक्रमे ३९ आणि ८ धावा दिल्या.
हेही वाचा >>> जाडेजा शून्यावर झाला बाद, चेन्नईच्या कर्णधाराने स्टंपवर काढला राग, भर मैदानात नेमकं काय केलं ?
तर दुसरीकडे लखनऊनच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आवेश खान, कृणाल पांड्या यांनी हैदराबादला रोखून धरलं. पहिल्या सहा षटकांत आवेश खानने अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन या सलामीच्या खेळाडूंना तंबुत पाठवले. तसेच मधल्या फळीतील निकोलस पुरन आणि अब्दुल समद यांना बाद करण्यातही आवेश खानला यश मिळाले. आवेश खानने चार षटकांत २४ धावा देत तब्बल चार बळी घेतले. तसेच कृणाल पांड्याने ४ षटकात २७ धावा देत दोन बळी घेतले. शेवटच्या षटकात जेसन होल्डरने आपली जादू दाखवली. त्याने शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर, भूवनेश्वर कुमार आणि रोमारिओ शेफर्ड या तीन फलंदाजांना झेलबाद केले.