भारताचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आयपीएल २०२२ दरम्यान अनुभवी समालोचक म्हणून पुनरागमन करणार असल्याची माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षांत कॉमेंट्री बॉक्समधील त्यांच्या अनुपस्थितीबद्दल भाष्य करताना, रवि शास्त्रीने बीसीसीआयला सुनावले आहे.आयपीएलच्या या मोसमात रवी शास्त्री आणि सुरेश रैनाच्या कॉमेंट्रीचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे दोघेही स्टार स्पोर्ट्सच्या हिंदी कॉमेंट्री टीमचा भाग असणार आहेत. रवी शास्त्री पाच वर्षांनंतर समालोचनात परतले आहेत, तर सुरेश रैनाची ही पहिली वेळ असणार आहे.
“आयपीएलचा हा १५वा सीझन आहे. मी यापूर्वी ११ वर्षे समालोचन केले होते. पण बीसीसीआयच्या मूर्ख घटनेतील ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ या कलमामुळे मी गेल्या ५ वर्षात ते करू शकलो नाही. माईकच्या मागे राहून आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणे माझ्यासाठी आनंददायी आहे. पण सुरेश रैना आपले ज्या प्रकारचे मनोरंजन करतो ते विलक्षण होते. आयपीएलमध्ये तुम्ही त्याला मिस्टर आयपीएल म्हणता. मी तुमच्याशी असहमत असू शकत नाही कारण एकामागून एक सीझन आयपीएलमध्ये तो चमकत आहे आणि एका संघासाठी सलग खेळणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे,” असे रवि शास्त्री म्हणाले.
“माझ्या मते आयपीएल वर्षानुवर्षे आश्चर्यचकित करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकच गोष्ट वारंवार पाहत असाल, तर तुम्ही माझ्यासाठी चूक करत असाल. क्रिकेटचा दर्जा सर्वात महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी हा एक चांगला ब्रेक आहे आणि जेव्हा मी पाच वर्षांनी परतत आहे तेव्हा मी खूप उत्साहित आहे,” असेही शास्त्रींनी म्हटले. ‘आता गर्दीसमोर वेगळे आव्हान आहे. माझा देश आणि संघासाठी गर्दीसमोर खेळणे हे नेहमीच माझे पहिले प्रेम होते. पण कॉमेंट्री करणे कठीण होईल, अशी प्रतिक्रिया सुरेश रैनाने दिली आहे.