IPL 2022 SRH vs KKR match result : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील आज २५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) खेळला गेला. मुंबईमधील ब्रेबोर्न स्टेडियमवरील या सामन्यात हैदराबादने कोलकातावर ७ विकेटने दमदार विजय मिळवला. हैदराबादने नाणेफक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर कोलकाताने २० षटकात ८ बाद १७५ धावा केल्या. यानंतर मैदानात उतरलेल्या हैदराबादने १८ व्या षटकातच ३ विकेट गमावून १७६ धावा केल्या आणि सामना खिशात टाकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनरायझर्स हैदराबादने सलग तिसरा सामना जिंकला आहे. आतापर्यंत हैदराबादने ५ सामने खेळले. त्यापैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. या विजयासह हैदराबाद गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर गेलाय. दुसरीकडे कोलकाता या पराभवासह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला. कोलकाताने आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले. त्यापैकी कोलकाताने ३ सामन्यात विजय मिळवला आहे.

कोलकाताची फलंदाजी

कोलकाता संघाकडून नितिश राणाने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. यात २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. कोलकाताची सुरुवात खराब झाली. केकेआरला दुसऱ्याच षटकात पहिला झटका बसला. मार्को येनसेनने आरोन फिंचला तंबुत पाठवलं. फिंचला ५ चेंडूत केवळ ७ धावा करता आल्या. यानंतर पाचव्या षटकात कोलकाताला दुसरा झटका लागला. हैदराबादचा गोलंदाज नटराजनने कोलकात्याच्या व्यंकटेश अय्यरला बाद केलं. अय्यरला १३ चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या.

यानंतर नटराजनने त्याच षटकात सुनील नरेनला बाद करत माघारी पाठवलं. नरेनने २ चेंडूत ६ धावा केल्या. १० व्या षटकात उमरान मलिकने श्रेयस अय्यरला बाद करत चौथी विकेट घेतली. श्रेयस अय्यरने २५ चेंडूत २८ धावा केल्या. यात त्याच्या ३ चौकारांचा समावेश आहे. कोलकाताला पाचवा झटका १३ व्या षटकात लागला. उमरान मलिकने शेल्डन जॅक्सनला बाद केलं. जॅक्सनने ७ चेंडूत ७ धावा केल्या.

यानंतर कोलकाताला नितिश राणाच्या रुपात सहावा झटका लागला. त्याला नटराजनने बाद केलं. नितिश राणाने ३६ चेंडूत ५४ धावा केल्या. यात २ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश आहे. १९ व्या षटकात पॅट कमिंसला बाद करत भुवनेश्वर कुमारने कोलकाताला ७ वा झटका दिला. कमिंसला ३ चेंडूत केवळ ३ धावा काढता आल्या. २० व्या षटकात जगदीश सुचितने अमन खानला बाद करत कोलकाताला ८ वा झटका दिला. अमन खानने ३ चेंडूत ५ धावा केल्या.

सनरायझर्सची फलंदाजी

कोलकाताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करमने अर्धशतकं झळकावली. हैदराबादची सुरुवात देखील खराब झाली. पावरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज तंबुत परतले. दुसऱ्याच षटकात अभिषेक शर्माला बाद करत पॅट कमिंसने हैदराबादला पहिला झटका दिला. शर्माने१० चेंडूत केवळ ३ धावा केल्या.

यानंतर केन विलियमसनला बाद करत आंद्रे रसेलने हैदराबादला ६ व्या षटकात दुसरा झटका दिला. केनने १६ चेंडूत १७ धावा केल्या. १५ व्या षटकात रसेलने राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबादला तिसरा झटका दिला. त्रिपाठीने ३७ चेंडूत ७१ धावांची तुफान फलंदाजी केली. यात ६ षटकार ४ चौकारांचा समावेश आहे. एडन मार्करम ३६ चेंडूत ६८ धावा आणि निकोलस पूरन ८ चेंडूत ५ धावा करून नाबाद राहिले.

हेही वाचा : IPL 2022 CSK : “मला खरंच खेळण्याची इच्छा होती, मात्र…”, आयपीएलमधून बाहेर होताच दीपक चहरची पहिली प्रतिक्रिया

हैदराबादच्या संघात एक बदल करण्यात आला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर जगदीश सुचितला संधी देण्यात आली होती. कोलकाताच्या संघात तीन बदल करण्यात आले होते. अजिंक्य रहाणेच्या जागेवर शेल्डन जॅक्सन आणि रसिख सलामच्या जागेवर अमान खानला संधी मिळाली. सॅम बिलिंग्स ऐवजी आरोन फिंचला खेळवण्यात आलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 sunrisers hyderabad kolkata knight riders srh vs kkr match updates result 15 april 2022 pbs