राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद ९८ धावांची खेळी केली. या खेळीमुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता राजस्थानने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा दावा बळकट केला आहे. यशस्वीला सामन्यानंतर विचारण्यात आले की, शतक पूर्ण न केल्याने तो दु:खी आहे का? यावर, युवा सलामीवीर म्हणाला की, “मी कधीही शतक करण्यावर लक्ष केंद्रित केले नाही.” या विधानाने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
यशस्वीने सांगितले त्याला शतकापेक्षा विजय महत्त्वाचा होता
सामन्यानंतर यशस्वी म्हणाला, “मैदानावर जाऊन चांगले खेळले पाहिजे, हेच नेहमी माझ्या मनात असते. या सामन्यात फलंदाजी करताना खूप छान वाटले. मला जे हवे आहे नेहमी तसेच घडते असे नाही, पण आज माझी चांगली झाली. सामन्याआधी मी चांगली तयारी करतो आणि स्वतःवर विश्वास ठेवतो. आपण आपले शंभर टक्के दिले तर मला माहित आहे की निकाल चांगले येतील. शतकापेक्षा विजयी शॉट मारण्यात मला खूप आनंद झाला. मला सामना लवकर संपवायचा होता जेणेकरून प्लेऑफ मध्ये वरच्या स्थानावर जाऊ शकू. मी आज खुश आहे की संघाला शानदार विजय मिळवून दिला. बटलर, संजू यांचा आभारी आहे.”
हर्षा भोगले यांनी पुढे त्याला विचारले की, “शतक हुकल्याची भावना काय आहे?” याला उत्तर देताना यशस्वी म्हणाला, “मला वाटते की संघाचा नेट रन रेट वाढावा हे माझ्या डोक्यात होते. मी आणि संजू भाई (संजू सॅमसन) फक्त खेळ लवकर संपवण्याबद्दल बोलत होतो.” दुसऱ्याच षटकात जॉस बटलर धावबाद झाल्याने राजस्थानला मोठा धक्का बसला. त्यामुळे यशस्वीवर अधिक जबाबदारी आली होती आणि त्याने यशस्वीपणे पार पाडली.
पॉइंट टेबलमध्ये राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे
यशस्वी म्हणाला, “मला वाटतं हे एका सामन्यात घडतं. यापेक्षा आणखी चांगले करण्याची जबाबदारी संघावर आली आहे. संजू भाई आले आणि मला म्हणाले की, तुझा नैसर्गिक खेळ खेळत राहा आणि त्या रनआउटचा विचार करू नको.” राजस्थानचा संघ १२ सामन्यांत सहा विजयांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. संघाने सहा सामने गमावले आहेत. या शानदार विजयाने त्याचा निव्वळ धावगती +०.६३३ वर पोहोचला आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या. जेसन रॉयने १० धावा, रहमानउल्ला गुरबाजने १८ धावा, कर्णधार नितीश राणाने २२ धावा, आंद्रे रसेलने १० धावा, रिंकू सिंगने १६ धावा, शार्दुल ठाकूरने एक धाव आणि सुनील नरेनने सहा धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या ४२ चेंडूत ५७ धावांच्या खेळीने कोलकात्याला १४९ धावांपर्यंत मजल मारली. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि चार षटकार मारले. चहलने चार विकेट घेतल्या. विकेट घेताच चहलने या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ब्राव्होने १८३, तर चहलने १८७ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ट्रेंट बोल्टने दोन विकेट घेतल्या. संदीप शर्मा आणि केएम आसिफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.