Ajinkya Rahane : चेन्नई टीमचा फलंदाज असलेला मुंबईकर अजिंक्य रहाणेने वानखेडेच्या मैदानावर झंझावती खेळी करत अवघ्या १९ चेंडूंमध्ये झंझावाती अर्धशतक करत मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली. चेन्नईकडून रहाणेने पदार्पण केलं आणि पहिल्याच सामन्यात त्याचा फॉर्म दिसून आला.
मुंबईने दिलेल्या १५८ धावांच्या माफक आव्हानांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरूवात ढेपाळली होती. डेवॉन कॉनवे गोल्डन डक झाला. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर त्याने मॅचचं चित्र बदललं. वानखेडे मैदानावर चौफेर टोलेबाजी करत अजिंक्यने १९ चेंडूंमध्ये झंझावाती अर्धशतक झळकावलं. १९ चेंडूंमध्ये ५० धावा करताना अजिंक्यने तीन षटकार आणि सात चौकारांची आतषबाजी केली. अजिंक्य रहाणेने २७ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. ऋतुराजसोबत अजिंक्यने ८२ धावांची पार्टनरशिप केली. यामध्ये एकट्या अजिंक्यच्या ६१ धावा होत्या. त्याचा फॉर्म परत आल्याचं पाहायला मिळालं.
अजिंक्य रहाणेने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. याआधी हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर होता. शार्दुल ठाकूरने आरसीबीविरोधात २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. रहाणेने हा विक्रम मोडीत काढत अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेटकरी त्याच्या दमदार खेळीचे कौतुक करत आहेत.