Hardik Pandya Aakash Ambani: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सने चमकदार कामगिरी करत ५५ धावांनी विजय मिळवला. मुंबईचा हा चौथा पराभव आहे. गुजरात आता पाच सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. माहितीसाठी हा सामना आयपीएल २०२३ चा ३५ वा सामना होता जो अहमदाबादमध्ये खेळला गेला होता, नेहमीप्रमाणे हा सामना पाहण्यासाठी आकाश अंबानी देखील उपस्थित होता. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी चांगलाच निराश झाला. अशा परिस्थितीत विरोधी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने असे काही केले ज्यामुळे चर्चेत आली.
मुंबईला हरवल्यानंतर हार्दिक पांड्याने विरोधी संघाचे मालक आकाश अंबानी यांच्याकडे जाऊन त्याच्या “ अरे भाई ये तो होता ही रहता है.” असे म्हणून खांद्यावर हात ठेवत सांत्वन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांच्या खांद्यावर हात ठेवून मैदानात चालताना दिसत आहे.
गिलने अप्रतिम फलंदाजी केली
शुबमन गिलच्या अर्धशतकानंतर गुजरात टायटन्सने मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या जोरावर ६ बाद २०७ धावा केल्या. डेव्हिड मिलरने २२ चेंडूत ४६ धावा केल्या. राहुल तेवतिया (पाच चेंडूत नाबाद २०) आणि अभिनव मनोहर यांनी २१ चेंडूत केवळ उपयुक्त ४२ धावा केल्या नाहीत तर मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.
पियुष चावलाची चांगली गोलंदाजी
पहिल्या पाच षटकांत गिलची बॅट शांत होती पण त्यानंतर कॅमेरून ग्रीनच्या षटकात त्याने १७ धावा कुटल्या. पॉवरप्लेमध्ये गुजरातने एका विकेटच्या मोबदल्यात ५० धावा केल्या होत्या. गतविजेत्या गुजरातला पियुष चावलाने (२/३४) अप्रतिम गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात गुजरातने दमदार गोलंदाजी करत मुंबईला २० षटकांत ९ बाद १५२ धावांवर रोखले. नूर आणि राशिद शिवाय मोहित शर्मा (२/३८) आणि हार्दिक पांड्या (१/१०) यांनीही विकेट्स घेतल्या. मुंबईच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली, कर्णधार रोहित शर्मा दोन धावा काढून बाद झाला. अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने २६ चेंडूत ३३ धावा करत संघाला सुरुवातीच्या धक्क्यातून बाहेर काढले. त्याने तीन षटकार मारले. मात्र तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (२३) आणि टीम डेव्हिड (००) यांनीही तंबूची वाट धरली आणि संघाची अवस्था ५ बाद ५९ अशी झाली होती. नूर अहमद आणि राशिद खान यांच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने मंगळवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी पराभव केला.