David Warner DC vs MI IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार अक्षर पटेलने म्हटले आहे की, “कर्णधार डेव्हिड वॉर्नर गेल्या दोन-तीन सामन्यांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे, पण चेंडू त्याच्या बॅटवर नीट येत नाहीये.” तो म्हणाला की, “चार पराभवानंतरही आपल्याला सकारात्मक राहण्याची गरज आहे.” दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने या आयपीएलच्या चार डावांमध्ये तीन अर्धशतके आणि एक ३७ धावांची खेळी केली आहे. मात्र, या काळात त्याचा स्ट्राइक रेट केवळ ११४.८३ राहिला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही त्याने ४७ चेंडूत केवळ ५१ धावा केल्या, ज्यात एकाही षटकाराचा समावेश नव्हता.
अक्षरला जेव्हा वॉर्नरच्या स्ट्राईक रेटबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “गेल्या दोन-तीन सामन्यांबद्दल बोलायचे तर वॉर्नर फटके मारण्याचा प्रयत्न करत आहे, पण चेंडू त्याच्या बॅटवर नीट येत नाही. तो काय विचार करत आहे हे मला माहीत नाही. फॉर्ममध्ये आहे, पण संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी स्पष्टपणे बोलले पाहिजे. पृथ्वी जेव्हा खेळतो तेव्हा त्याला शीट अँकरची भूमिका करावी लागते. पण दुसरीकडे, समोरून विकेट पडत राहिल्या, तर तोही फारस काही करू शकत नाही. याकडे आपण लक्ष द्यायला हवे. यावर पाँटिंग, वॉटसन आणि सौरव गांगुली चर्चा केली आहे. सर्वांनी त्याचे व्हिडिओ पाहिले आहेत आणि तो काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे देखील त्याला सांगितले आहे आणि वॉर्नर देखील त्यावर काम करत आहे.”
या सामन्यात दिल्लीला शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीचा हा सलग चौथा पराभव आहे. सलग चार सामन्यांतील चार पराभवानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार अक्षर पटेल पत्रकार परिषदेला आला, तेव्हा त्याने गंमतीने पत्रकारांना सांगितले की, “इथेही कठीण प्रश्न विचारू नका,” त्यानंतर तो जोरात हसायला लागला. “पत्रकार परिषदेत भूतकाळ विसरून पुढच्या सामन्यांना सकारात्मकतेने पाहण्याचा दिल्लीचा दृष्टिकोन आहे,” असे त्याने सांगितले.
तो म्हणाला, “चार पराभवांनंतर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या मनात हे ठरवून घ्या की आम्ही वाईट खेळत आहोत, रन रेट सुद्धा चांगला चालत नाही आहे, पण यामुळे परिस्थिती आणखी खराब होईल.” जर तुम्ही जिंकलात, मग तुमच्या आत्मविश्वासात नक्कीच फरक पडतो. पुढे काय होईल, याचा विचार केला तर तुमचा आत्मविश्वास कमी होईल आणि तुमच्या वाट्याला येणारी कामगिरीत तुम्ही सुधारणा करू शकणार नाहीत. मला वाटते की सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. आमचे सर्व खेळाडू एकत्र कामगिरी करत नाहीत म्हणूनच प्रत्येक सामन्यात प्लेईंग ११ बदलत आहे.
अक्षर पटेलच्या ‘या’ वक्तव्याने खळबळ उडाली
फलंदाजीची क्रमवारी वर पाठवण्याच्या शक्यतेवर अक्षर म्हणाला की, “खालच्या क्रमवारीतही अशा फलंदाजाची गरज आहे जो जलद धावा करू शकेल आणि संघासाठी चांगल्या फिनिशरची भूमिका बजावू शकेल.” तो पुढे म्हणाला, “या क्रमाने (सातव्या क्रमांकावर) आल्यानंतरही मला १० ते १२ षटके खेळण्याची संधी मिळत आहे, जी टी२० मध्ये माझ्यासाठी पुरेशी आहे. फलंदाजीच्या क्रमाबद्दल संघ व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे, परंतु जर मी वर खेळलो आणि लवकर आऊट झालो तर डावाच्या शेवटी जलद धावा करणे कठीण होऊ शकते. जर मी वरच्या क्रमवारीत फलंदाजी केली तर शेवटी खेळ कोण पूर्ण करेल आणि मी स्वस्तात बाद झालो तर काय? ही दुधारी तलवार आहे, मला वाटते की मी सातव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत आहे आणि माझी भूमिका देखील खेळ पूर्ण करणे आहे,” तो पुढे म्हणाला.
सलग तीन वर्षे दिल्लीकडून खेळत आहे
अक्षर म्हणाला की, “संघाकडे पुरेसा अनुभव असलेले देशांतर्गत खेळाडू आहेत, पण संघ एकजुटीने कामगिरी करू शकत नाही.” तो म्हणाला, “आमच्या देशांतर्गत खेळाडूंना अनुभव आहे. यश धुल अंडर-१९ खेळला आहे आणि ललित यादव दोन-तीन वर्षांपासून सतत दिल्लीकडून खेळत आहे. फक्त प्रत्येकाला एकजुटीने कामगिरी करता येत नाही. या मोसमात आतापर्यंत दिल्ली संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. दिल्लीच्या या सततच्या पराभवासाठी आता क्रिकेट चाहते डेव्हिड वॉर्नरला जबाबदार मानत आहेत. डेव्हिड वॉर्नर अत्यंत संथ गतीने फलंदाजी करत असून हेच दिल्लीच्या पराभवाचे कारण असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर ‘स्वार्थी खेळाडू’ आणि ‘एकदिवसीय विश्वचषकाचा सराव’ अशा प्रतिक्रिया येत आहेत.