Shahid Afridi On Naveen-ul-Haq: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा सोशल मीडियावर यांचा वाद अजूनही गाजतो आहे. खरे तर सोमवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हकच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, नवीन-उल-हक आणि अमित मिश्रा फलंदाजी करत असताना हा संपूर्ण वाद सुरू झाल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. मात्र, त्यावेळी मैदानावरील अंपायर्सनी हे प्रकरण शांत केले.
नवीन-उल-हकला जुना इतिहास!
अफगाणिस्तानचा खेळाडू आणि आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा भाग असलेल्या नवीन-उल-हकचा विरोधी संघातील खेळाडूंशी अनेकदा भडका उडाला आहे. अलीकडेच ‘लंका प्रीमियर लीग’मध्ये नवीन-उल-हकची पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरशी चकमक झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध झाले. याशिवाय नवीन-उल-हक पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीशी देखील भांडला आहे. आता नुकत्याच झालेल्या विराट-नवीन वादावर शाहिद आफ्रिदीने एक ट्विट केले आहे. यासोबतच शाहिद आफ्रिदीने या ट्विटद्वारे नवीन-उल-हकवर टीका केली आणि मोलाचा सल्लाही दिला आहे.
शाहिद आफ्रिदीचा नवीन-उल-हकला सल्ला…
शाहिद आफ्रिदीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी नेहमीच तरुण खेळाडूंना आक्रमकता कमी करून त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्याचा सल्ला देतो… इतर निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकू नका.” तो म्हणाला की, “अफगाणिस्तान क्रिकेट संघात माझे अनेक पठाणी मित्र आहेत, ज्यांच्याशी माझे चांगले नाते आहे.” यासोबतच तो म्हणाला की, “एक क्रिकेटपटू म्हणून आपल्या सहकारी खेळाडूंचा आदर करणे आवश्यक आहे… याशिवाय विरोधी संघातील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्तीची भावना ठेवा. नको तिथे वाद घालणे हे चांगल्या खिलाडूवृत्तीचे लक्षण नाही. सर्वात आधी खेळ, क्रिकेट आहे.”
नवीन उल हकने शाहिद आफ्रिदीला दिले उत्तर
नवीन-उल-हकने त्याचवेळी शाहिद आफ्रिदीच्या ट्विटला उत्तर दिले आहे. नवीन उल हक लिहितो की, “मी तुमच्या सल्ल्यानुसार वागायला सदैव तयार असतो, समोरच्या खेळाडूला मान द्यायला हजर असतो…” तो म्हणाला की, “क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे यात शंका नाही, पण याचा अर्थ असा नाही की कोणीतरी तुम्हाला सांगावे. की तू माझ्या पायाखाली आहेस किंवा पायाची धूळ आहेस.” त्याचवेळी नवीन-उल-हक म्हणाला की, “मी हे केवळ माझ्याबद्दलच बोलत नाही, तर माझ्या देशातील आणि संघातील लोकांबद्दलही त्यांचे असेच विचार आहेत. हे आधी बदलणे गरजेचे आहे.”