IPL 2023 News: सध्या भारतात आयपीएल २०२३ च्या सीझनची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या कृत्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संतापले आहे. वास्तविक, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळलेल्या पहिल्या आयपीएल सामन्यात ऋषभ पंतचा सन्मान करण्यासाठी त्याच्या संघाच्या डगआउटवर त्याची १७ क्रमांकाची जर्सी टांगली होती. आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सची ही कृती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) आवडली नाही.
ऋषभ पंतची जर्सी टांगल्याने बीसीसीआय संतापले
गेल्या वर्षी ३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. ऋषभ पंत अजूनही क्रॅचच्या सहाय्याने चालत असला तरी दुखापतीतून सावरण्याच्या टप्प्यातून जात आहे. ऋषभ पंतला पूर्णपणे सावरायला एक ते दीड वर्ष लागतील. अशा परिस्थितीत ऋषभ पंत या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय भूमीवर होणाऱ्या २०२३ विश्वचषकात टीम इंडियासाठी खेळू शकणार नाही.
दिल्ली कॅपिटल्सला दिली स्पष्ट शब्दात ताकीद
दिल्ली कॅपिटल्स संघाने ऋषभ पंतची जर्सी डगआउटवर टांगली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आवडले नाही. या निर्णयावर बीसीसीआय खूश नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “एखादी मोठी घटना किंवा मोठी दुर्घटना घडली असेल किंवा एखादा खेळाडू निवृत्त झाला असेल तेव्हा अशा प्रकारचा सन्मान केला जातो. या प्रकरणात तसे नाही. ऋषभ पंत पूर्णपणे सुरक्षित आहे आणि दुखापतीतून अपेक्षेपेक्षा लवकर सावरत आहे. हे उदात्त हेतूने केले जात असताना, बीसीसीआयने फ्रँचायझींना स्पष्ट शब्दात ताकीद देत भविष्यात अशा प्रकारची कृती करू नयेत असे सांगितले आहे.”
ऋषभ पंतसाठी कठीण काळ आहे
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी येणारा काळ खूप कठीण असणार आहे. एकंदरीत २०२३ साली ऋषभ पंतचे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन शक्य दिसत नाही. अशा परिस्थितीत ऋषभ पंतचे टीम इंडियातील स्थान धोक्यात आले आहे. भारताकडे असे तीन धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज आहेत, जे २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंतचे स्थान हिरावून घेऊ शकतात. २०२३च्या विश्वचषकात केएल राहुल, इशान किशन आणि संजू सॅमसन हे टीम इंडियामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या स्थानासाठी दावेदारी सिद्ध करण्यासाठी सज्ज आहेत.
मंगळवारी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी घरच्या मैदानावर उतरलेल्या दिल्लीला पुन्हा एकदा विजयी रेषेपार जाण्यात अपयश आले. गतविजेत्या गुजरातने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन करत ६ गडी राखून विजय मिळवला.