चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना शुक्रवारी ५ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरूद्ध होणार आहे. चेन्नईने सुरूवातीच्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला पण तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावणारा मुस्तफिजूर रहमान हा अचानक बांगलादेशला म्हणजेच त्याच्या मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो पुढील सामन्यात तो खेळताना की नाही याबाबत साशंकता आहे.
बांगलादेशच्या या वेगवान गोलंदाजाने चेन्नईकडून खेळताना या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून पर्पल कॅप त्याच्या नावावर आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आगामी टी-२० विश्वचषकासंबंधित व्हिसाचे काम पूर्ण करण्यासाठी तो मायदेशात गेला. आयपीएल संपल्यानंतर आठवड्याभरात म्हणजेच १ जूनपासून टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना हा २६ मे रोजी खेळवला जाईल. त्यामुळे हे व्हिसाचे हे काम पूर्ण करण्यासाठी तो आयपीएल सुरू असतानाच मायदेशी परतला आहे.
चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रहमानने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे आणि ४ षटकांत केवळ २९ धावा देत ४ विकेट्स मिळवले. यामुळे आरसीबी संघाचे कंबरडे मोडले आणि चेन्नईने सामना जिंकला. यानंतर सीएसकेच्या दुसऱ्या सामन्यातही मुस्तफिझूरने ४ षटकांत ३० धावा देत २ विकेट घेतले. यानंतर दिल्लीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुस्तफिझूरने फक्त एक विकेट घेतली. अशारितीने तीन सामन्यांमध्ये ७ विकेट घेतल्याने पर्पल कॅपचा मानकरी सध्या रहमान आहे.
चेन्नई सुपर किंग्सची आयपीएल मोहीम आतापर्यंत चांगली राहिली आहे. संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये मुस्तफिजूर रहमानने एक गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण आयपीएलमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणाऱ्या हैदराबाद संघाविरूद्धच्या सामन्यात तो खेळेल याची शंका कमी आहे. ज्याचा चेन्नईला मोठा फटका बसू शकतो. संघात एकापेक्षा एक चांगले गोलंदाज असले तरी त्याचा रेकॉर्ड पाहता चेन्नईसमोर त्याची कमी भरून काढण्याचे मोठे आव्हान असेल.