Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL Match Updates: आयपीएलच्या १६व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसकेने) पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर दबदबा कायम ठेवला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सीएसकेने ३ गडी गमावून १३५ धावांचे लक्ष्य गाठत या मोसमातील चौथा विजय नोंदवला. या सामन्यात डेव्हॉन कॉनवेने संघासाठी ७७ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून फलंदाजी करताना डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७७ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर हैदराबाद संघाकडून मयंक मार्कंडे शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २३ धावा देत २ गडी बाद केले.
ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली –
१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीच्या जोडीने चेन्नई सुपर किंग्ज संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या ६ षटकातच सामना एकतर्फी करण्याचे काम दोन्ही फलंदाजांनी केले आणि संघाची धावसंख्या ६० धावांपर्यंत नेली.
हैदराबादच्या डावाची सुरुवात खराब झाली –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने २० षटकांत ७ गडी गमावून १३४ धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचे १०० धावांच्या आत ५ खेळाडू बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. हॅरी ब्रूक अवघ्या १८ धावांवर बाद झाला. अभिषेक शर्माने १३०.७६च्या स्ट्राइक रेटने २६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ३४ धावा केल्या. राहुल त्रिपाठीनेही २१ धावांची खेळी केली. कर्णधार एडन मार्कराम पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो केवळ १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने ४ षटकात 22 धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले.
सहा सामन्यांमधील हा चौथा विजय –
चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनौ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा धावगती सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे आणि यामुळे आरआर अव्वल आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.