गुवाहाटी : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध शनिवारी होणाऱ्या ‘आयपीएल’च्या सामन्यात विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. या वेळी दिल्लीच्या फलंदाजांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाचे चमकदार कामगिरी करण्याचे लक्ष्य असेल. राजस्थानने सलामीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या लढतीत पंजाब किंग्जकडून पराभव पत्करला.
पृथ्वी, मार्श, सर्फराजवर नजर
पहिल्या दोन सामन्यांत मार्क वूड आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या तेजतर्रार मारा करणाऱ्या गोलंदाजांनी पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान यांसारख्या दिल्लीच्या फलंदाजांना अडचणीत टाकले होते. राजस्थानविरुद्ध त्यांना ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि जेसन होल्डरसारख्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहलच्या रूपात अप्रतिम फिरकीपटूही आहेत. पृथ्वी व सर्फराजला आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा सामना करताना अडचणी येत आहेत. सर्फराजला वगळायचे झाल्यास दिल्लीकडे यश धुल, रिपल पटेल आणि ललित यादव यांचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच अनुभवी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांच्याकडून दिल्लीला मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल.
जैस्वाल, सॅमसनवर मदार
सलामीवीर जोस बटलर या लढतीत खेळण्याबाबत साशंकता आहे. गेल्या सामन्यात झेल पकडताना बटलर जायबंदी झाला होता. बटलर या सामन्याला मुकल्यास जो रूटला त्याच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन चांगल्या लयीत आहे. ते आनरिख नॉर्किए, खलील अहमद आणि कुलदीप यादव यांसारख्या गोलंदाजांसमोर आव्हान उपस्थित करू शकतात. त्यामुळे या सामन्यात राजस्थानचे पारडे जड मानले जात आहे.
वेळ : दुपारी ३.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी