MS Dhoni Knee Injury: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. असे असूनही तो आयपीएल २०२३मध्ये त्याच्या संघासाठी सतत झटत आहे. १४ मे रोजी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान त्याच्या दुखापतीचा फोटो व्हायरल झाला होता. वास्तविक चेन्नईने या मोसमातील शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला. या सामन्यानंतर धोनीने चेपॉकमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी मैदानावर फेरफटका मारला, हा अविस्मरणीय क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेव्हा तो आपल्या संघातील खेळाडूंसोबत मैदानात फेरफटका मारत होता, तेव्हा त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर बर्फाचा पॅक बांधला होता. ते पाहून तो जखमी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
धोनीने दुजोरा दिला आहे
अलीकडेच एम.एस. धोनी म्हणाला होता की, “तो जास्त धावू शकत नाही. फुटवर्कचा वापर करून फटकेबाजी करणे हे त्याचे काम आहे आणि त्याला ते खूप आवडते. तेव्हा धोनी बहुधा गुडघ्याच्या दुखापतीकडे बोट दाखवत होता. १०व्या सामन्यात माहीने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ९ चेंडूत २० धावांची खेळी केली. धावा काढताना एम.एस. धोनीचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. पण या मोसमात त्याने गुडघ्याच्या दुखापतीमुळे अनेक एकेरी धावा दुहेरीमध्ये तो बदलू शकला नाही. याशिवाय अनेक सामन्यांमध्ये तो खूप उशिरा फलंदाजीला आला आहे. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे हे सर्व घडत आहे. कोलकाता विरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या गुडघ्यावर बर्फाचा पॅक बांधलेला पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी भावनिक ट्विटही केले.
आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे. या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ चांगली कामगिरी करत आहे. त्याचवेळी, गेल्या काही महिन्यांपासून अशा बातम्या येत आहेत की आयपीएलमधील खेळाडू म्हणून धोनीचा हा शेवटचा हंगाम आहे. धोनी आता आयपीएलच्या पुढच्या सीझनपासून खेळताना दिसणार नाही, असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. चेन्नई सुपर किंग्ज किंवा धोनीकडून याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तर गेल्या काही सामन्यांमध्ये धोनी धावा काढताना अडचणीत दिसला होता. खरं तर, गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनीला नीट धावाही करता येत नाहीत.
दुसरीकडे, रविवारी कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर धोनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांचे आभार मानताना दिसला. त्यानंतर असे बोलले जात आहे की धोनी कदाचित आयपीएलच्या पुढील सीझनपासून खेळताना दिसणार नाही.
इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये धोनी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मोसमात खालच्या क्रमाने फलंदाजी करताना, त्याने १३ सामन्यांच्या ९ डावात ९८ धावा केल्या आहेत, १९६.००च्या स्ट्राइक रेटसह ७ वेळा नाबाद राहिले आहेत. या मोसमात धोनीने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. आयपीएल २०२३मध्ये त्याने आतापर्यंत ३ चौकार आणि १० षटकार मारले आहेत. एकूणच या मोसमात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी चांगली झाली आहे. चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे. सीएसकेचा संघ या मोसमातील शेवटचा सामना २० मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे.