आयपीएल २०२२ उमरान मलिकच्या नावावर होते, या सीझनमध्ये मलिकने तब्बल २२ विकेट्स घेतल्या आणि तो पर्पल कॅपच्या शर्यतीतही होता. तसेच, आयपीएल २०२२मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी उघडले. मात्र, २०२३च्या हंगामात तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे आयपीएलच्या चालू हंगामात तो काही विशेष दाखवू शकलेला नाही. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या १६व्या हंगामात एकूण १३ सामने खेळले, परंतु मलिकने ७ सामने खेळले ज्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या, पण या सात सामन्यांपैकी बहुतांश सामन्यांमध्ये त्याला चार षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही.
१८ मे रोजी बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामन्यात नाणेफेकीच्या वेळी इयान बिशापने हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामला विचारले की, “उमरान मलिक या सामन्यात का खेळत नाही?”, एडन म्हणाला, “खरे सांगायचे तर, मी स्वतःहा परिपूर्ण नाही, उमरानबाबत मी काय सांगू? तो एक एक्स फॅक्टर असलेला खेळाडू आहे जो सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो पण पडद्यामागे काय आहे हे मला माहीत नाही, त्याच्याकडे भरपूर एक्स फॅक्टर आहे.”
मार्करमवर सेहवागने सडकून टीका केली
वीरेंद्र सेहवाग एडन मार्करमच्या पडद्यामागील उमरान मलिकबद्दलच्या विधानावर खूप नाराज झाला आणि त्याने मलिकचा बचाव करताना त्याच्यावर टीका केली आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, “मला खरोखरच ‘पडद्यामागील’ म्हणजे काय समजत नाही. कदाचित उमरान मलिकचे एसआरएच व्यवस्थापनाशी भांडण झाले असेल किंवा वाद झाला असेल, त्यामुळे तो असे म्हणत असावा. मात्र, एक कर्णधार म्हणून खेळाडूंच्या पाठिशी राहणे संघाला पहिले प्राधान्य देणे हे मार्करमला कळायला हवे होते. महत्वाचा खेळाडू संघातून बाहेर असणे हे कोणालाही परवडण्यासारखे अजिबातच नाही. तुम्हाला संधी दिली होती, पण तुम्ही कामगिरी केली नाही तर ती गोष्ट वेगळी होती. इथे मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे.”
दुसरीकडे, दिग्गज सलामीवीर सुनील गावसकर यांना असे वाटले की मार्कराम कदाचित केवळ आदेशांचे पालन करत आहे आणि निवडीच्या बाबतीत त्याला फारसे काही सांगायचे नाही. ते म्हणाले, “कदाचित मार्करमला उमरानला का वगळण्यात आले आहे हे ठाऊक नसावे किंवा त्याला निवडू नये असे संघाकडून सांगितले जाऊ शकते. जेव्हा मार्करामला संघानेच कोणतेही कारण दिले जात नाही, तेव्हा तो आणखी काय बोलेल, ”गावसकर यांच्या मते संघ व्यवस्थापनकडे सर्व अधिकार असून एडन मार्करम त्यात काहीही करू शकला नाही.