महेंद्रसिंग धोनी याला कॅप्टन कूल म्हणतात. त्याचे कारण म्हणजे त्याचा शांत स्वभाव. धोनी सामन्याच्या कोणत्याही परिस्थितीत शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया सामना जिंकण्यापासून हरण्यापर्यंत बदलत नाही. पण असे काही प्रसंग आले आहेत जेव्हा धोनीला राग आला होता. असच एक प्रसंग आयपीएल २०२३ मध्ये पाहायला मिळाली. महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सहकारी खेळाडूला फटकारतोय.
मोईन अलीवर धोनी भडकला
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस. धोनी आयपीएल २०२३ मध्ये गेल्या आठवड्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर आपला स्वभावाचा विरुद्ध वागताना दिसला. त्याचा पारा खूपच चढला होता. १७ एप्रिल रोजी, धोनी बंगळूरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मोईन अलीवर खूप भडकला. बंगळुरू चेन्नईने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करताना मोईनने क्षेत्ररक्षणात चूक केल्याबद्दल धोनीचा राग अनावर झाला.
ही घटना १८व्या षटकात घडली जेव्हा आरसीबीच्या तळाच्या फळीतील फलंदाज वेन पारनेल अतिरिक्त कव्हरवर शॉर्ट खेळला तेव्हा चेंडू क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अडखळला त्याने खराब फिल्डिंग करत संघाला धावांचे नुकसान पोहचवले. मोईनच्या या चुकीमुळे फलंदाजाला एक ऐवजी दोन धावा मिळू शकल्या, त्यामुळे धोनी संतापला. तो एवढा चिडला की त्याचे डोळे हे रागाने लालबुंद झाले होते. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे.
चेन्नईने बाजी मारली होती
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने ६ विकेट्स गमावत २२६ धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली फलंदाजी केली. एका क्षणी संघाचा विजय निश्चित दिसत होता. पण २० षटकांत त्यांचा संघ ८ विकेट्सवर २१८ धावाच करू शकला. या बाजूने चेन्नईने हा सामना ८ धावांनी जिंकला होता. आयपीएल२०२३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यामध्ये संघाने ५ विजय मिळवले आहेत.
सीएसके गुणतालिकेत अव्वल
चार वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स संघ या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आतापर्यंत सर्व संघांनी स्पर्धेत सात-सात सामने खेळले आहेत, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज ५ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. चेन्नईचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, परंतु असे असतानाही संघाने एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत १०व्या स्थानावर आहे.