अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स संघासमोर मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या सामन्यात गुजरात जायंट्सचे आव्हान असेल. दिल्लीच्या संघाला गुणतालिकेत वरील स्थानाच्या दिशेने कूच करायची झाल्यास त्यांचे भारतीय खेळाडू आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
अक्षर पटेलचा अपवाद वगळता दिल्लीच्या संघातील भारतीय खेळाडूंना, विशेषत: फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. पृथ्वी शॉ व सर्फराज खान यांच्या अपयशाचा दिल्ली संघाला फटका बसला आहे. दिल्लीला आठपैकी सहा लढतींत पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीला ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवायचे झाल्यास उर्वरित सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे.
’ वेळ : सायं. ७.३० वाजता
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा
कामगिरीत सातत्य गरजेचे
पृथ्वीच्या अपयशामुळे फिल सॉल्टला कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह दिल्लीच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. गेल्या सामन्यात त्याने आक्रमक खेळ केला. त्यामुळे दिल्लीला सॉल्टसह वॉर्नर आणि तिसऱ्या स्थानावर खेळणाऱ्या मिचेल मार्शकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. मार्शने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध गेल्या सामन्यात अष्टपैलू चमक दाखवली होती. दिल्लीच्या मधल्या फळीने मात्र निराशा केली आहे. त्यामुळे लयीत असलेल्या अक्षर पटेलला पाचव्या स्थानावर फलंदाजीस पाठवण्याचा दिल्लीला विचार करावा लागेल. गेल्या सामन्यात प्रियम गर्गला संधी मिळाली. मात्र, दिल्ली संघातील अन्य भारतीय फलंदाजांप्रमाणेच त्यालाही फारशा धावा करता आल्या नाहीत. संघातील भारतीय गोलंदाजांनीही निराशा केली आहे.
रशीद, नूरवर नजर
गतविजेत्या गुजरात जायंट्स संघाने आतापर्यंत आठ सामन्यांत सहा विजय मिळवले आहेत. गेले तीनही सामने जिंकण्यात त्यांना यश आले. गेल्या सामन्यात गुजरातने कोलकाता नाइट रायडर्सला १३ चेंडू राखून नमवले होते. गुजरातचे शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर व विजय शंकर हे फलंदाज लयीत आहेत. गेल्या सामन्यात शंकरने आक्रमक खेळ केला होता. आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जॉश लिटलने गोलंदाजीत चुणूक दाखवली आहे.रशीद खान व नूर अहमद या फिरकीपटूंवर गुजरातच्या गोलंदाजीची भिस्त असेल.