IPL 2023, Wasim Akram: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला फक्त एक महिना बाकी आहे, पण दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट टीमच्या अडचणी वाढत आहेत. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आधीच WTC फायनलमधून बाहेर पडले आहेत. शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि के.एल. राहुलही पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत.
सध्याच्या क्रिकेटमध्ये क्रिकेटर्सना सतत दुखापत होत आहे, त्यामुळे त्यांच्या करिअरवरही परिणाम होत आहे. अलीकडच्या काळात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दीपक चाहर दुखापतीमुळे सतत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज वसीम अक्रम याने गोलंदाजांच्या दुखापतीबाबत आपले मत मांडले आहे. स्पोर्ट्सकीडाशी बोलताना वसीमने खेळाडूंच्या अधिक दुखापतींच्या समस्येबद्दल बोलले आणि त्यामागील कारणही सांगितले.
दरम्यान, अनुभवी गोलंदाज आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने भारतीय गोलंदाजांना दुखापती टाळण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वसीम अक्रमला विचारण्यात आले की, “वेगवान गोलंदाजांना दुखापत होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुम्ही त्यांना आहार आणि व्यायामाबाबत काय सल्ला देऊ इच्छिता?”
वसीम अक्रम म्हणाले, “आजकाल जे संघाला फिजिओ मदत करायला असतात ती चांगली गोष्ट आहे. त्याने संघाला खूप मदत होत आहे, परंतु वेगवान गोलंदाजीमध्ये काही गोष्टी निश्चित आहेत, तुम्ही १०० वर्षांपूर्वी घ्या, आता घ्या, त्या समान आहेत. तुम्ही जितकी जास्त वेळ गोलंदाजी कराल तितकी तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता कमी होईल. जर दुखापत होऊ नये असे वाटत असेल तर रोज धावणे आवश्यक आहे. ऑफ डे मध्ये रनिंग करत नसाल तर मात्र अडचण होईल आणि तुमची शारिरीक स्थिती सांभाळणे कठीण होईल.”
तो म्हणाला, “मी माझ्या करिअरच्या शेवटच्या तीन वर्षात जिम जॉईन केली होती. त्याच्या व्यतिरिक्त फक्त गोलंदाजी आहे. किती १५०-२०० प्रथम श्रेणी सामने आरामात खेळले आहेत, आकडा आता माहीत नाही. इथे तुम्ही एखाद्याला २ फर्स्ट क्लास मॅच खेळायला सांगितले तर तो ६ दिवस उठत नाही. यामुळे त्याच्या शरीराला अधिक मेहनतीची सवय होत नाही. मी या लोकांना विनंती करेन की, जर तुम्हाला वेगवान गोलंदाज व्हायचे असेल, दुखापती कमी करायच्या असतील, तर तुम्हाला नेटमध्ये जास्त वेळ गोलंदाजी करावी लागेल.”
त्याचवेळी खेळाडूंना अधिक दुखापत होण्याच्या समस्येवर अक्रम पुढे म्हणाला, “माझा सल्ला असा आहे की खेळाच्या २-३ दिवस आधी तुम्ही किमान एक तास नेटमध्ये जास्तवेळ स्पेल टाका. जेव्हा तुम्ही चेंडू टाकता तेव्हा तुमचे स्नायू खेळासाठी तयार असण्याची अपेक्षा करतात? मी तरुणांना आणखी एक सल्ला देईन तो म्हणजे ५ दिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. टी२० क्रिकेट आणि आयपीएल हे क्षणिक आहे, परंतु जेव्हा तुम्ही ५ दिवसीय क्रिकेट खेळता तेव्हा तुमचा वेग वाढेल कारण तुम्ही लांबलचक स्पेल टाकाल आणि दुखापत होण्याची शक्यता कमी होईल.”