परदेशी खेळाडूंमध्ये आयपीएलची क्रेझ किती प्रमाणात आहे, याची झलक ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात पाहायला मिळाली. वास्तविक, आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिटेन आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल २०२३ च्या हंगामासाठी २३ डिसेंबर रोजी कोची येथे मिनी लिलाव होणार आहे. तत्पुर्वी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ६ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने अशी कमेंट केली, जी ऐकून कॅमेरून ग्रीनला सुद्धा हसू आले.
खरं तर, ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ४० व्या षटकात, बटलर विकेटच्या मागे कॅमेरून ग्रीनचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता, त्यादरम्यान त्याने एक वक्तव्य केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये इंग्लंडचा कर्णधार म्हणतोय, एक मोठा लिलाव होणार आहे. त्याचे हे बोलणे ऐकून कॅमेरून ग्रीन देखील हसला. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे आयपीएल लिलावापूर्वीच चर्चेत आहे. असे मानले जाते की मिनी लिलावात, फ्रँचायझी त्यांच्यावर जोरदार बोली लावू शकतात. कॅमेरून ग्रीनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी आठ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १७३.७५ राहिला आहे. ग्रीनने भारतात तीन टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २१४.५४च्या स्ट्राइक रेटने ११८ धावा केल्या आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर ओव्हलच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकात ९ गडी गमावून २८७ धावा केल्या होत्या. डेव्हिड मलानने १३४ धावांच्या शतकी खेळीत १२ चौकार आणि ४ षटकार लगावले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कांगारू संघाला डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने शानदार सलामी दिली. वॉर्नरने ८४ चेंडूत ८६ तर हेडने ५७ चेंडूत ६९ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ८० धावांची नाबाद खेळी केली. कॅमेरून ग्रीनने २० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ४७ व्या षटकात सहा गडी गमावून लक्ष्य सहज गाठले.