LSG vs DC Cricket Score Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये शनिवारी (१ एप्रिल) दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयी सलामी देण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते मात्र जायंट्सने ‘आप लखनऊ मे है’ असं म्हणत दिल्ली कॅपिटल्सला ५० धावांनी धूळ चारली. आपला नियमित कर्णधार ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या दिल्लीने या सामन्यावेळी त्याची आठवण काढली. हा सामना जिंकून त्याला भेट देण्याचा विचार मात्र फोल ठरला.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, अचानक लखनऊच्या ताफ्यातील मार्क वूड नावाचे वादळ घोंगावत आले आणि त्याने दिल्ली कॅपिटल्सला नेस्तनाबूत करत ५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर एलएसजीने १९४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून १४३ धावाच करू शकला. डीसीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४८ चेंडूत ७ चौकारांसह ५६ धावांची खेळी केली. त्या व्यतिरिक्त रिले रुसो ३० (२०), अक्षर पटेल १६ (११) आणि पृथ्वी शॉ १२ (९) यांनाच केवळ दोनआकडी संख्या गाठता आली. आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन बळी घेत मार्क वूडला साथ दिली.
तत्पूर्वी, आयपीएल २०२३ स्पर्धेत काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यापैकीच एक नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर हा होय. हा नियम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या नियमाचा फायदा पहिल्या दोन सामन्यात फारसा झाला नाही. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघातील तिसऱ्या सामन्यात या नियमाचा चांगलाच फायदा झाला. लखनऊच्या डावातील अखेरच्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात कृष्णप्पा गौथम फलंदाजीला आला. त्याने खेळपट्टीवर येताच षटकार ठोकत आपल्या संघाची धावसंख्या १९३ करून टाकली. गौथमने एकाच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला.
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतची जर्सी डग आऊटवर टांगली होती आणि त्यांच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली. दिल्लीच्या चेतन सकारियाने चौथ्या षटकात लखनऊचा कर्णधार लोकेश राहुल (८) याला बाद केले. कायले मायर्सचा सोपा झेल खलिल अहमदने टाकला अन् तोच महागात पडला. त्याने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दीपक हुडा व मायर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. यापैकी ६२ धावा (२४ चेंडू) या मायर्सने चोपल्या होत्या. कुलदीप यादवच्या गुगलीवर हुडा (१७) झेलबाद झाला.
लखनऊने कृणाल पांड्याला प्रमोशन देताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. मायर्स आज वादळ आणतोय असे दिसत असताना अक्षर पटेलने अप्रतिम चेंडू टाकला. मायर्स ३८ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ७३ धावांवर त्रिफळाचीत झाला. डोकेदुखी ठरणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला (१२) खलिलने बाद करून दिल्लीला मोठं यश मिळवून दिले. एक कॅरेबियन खेळाडू बाद झाल्यानंतर निकोलस पूरन दिल्लीचं टेंशन वाढवताना दिसला. पूरनने २१ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३६ धावा केल्या. खलिलच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉने चांगला झेल टिपला. खलिलने ३० धावांत दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर आलेल्या आयुष बदोनीने ७ चेंडूंत १८ चेंडू कुटल्या, चेतनने त्याची विकेट घेतली.