MS Dhoni IPL Retirement: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल असे बोलले जात आहे की, त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. यानंतर धोनी निवृत्त होणार आहे. मात्र, धोनीने आतापर्यंत याचा इन्कार केला आहे. आता संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीचे वक्तव्यही समोर आले आहे. शनिवारी (२० मे) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी हसीने धोनीच्या निवृत्तीबद्दल आणि त्याच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू हसीने सांगितले की, “धोनीच्या निवृत्तीबद्दल मला स्वतःला फारशी माहिती नाही. ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आम्ही बोललो नाही. तो शेवटचा आयपीएल खेळतोय की नाही हे फक्त त्यालाच माहीत आहे, संघाला माहीत नाही. तो षटकार मारतो आणि सामने जिंकवून देतो हाच धोनी आम्हाला परत हवा आहे. धोनीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, तो या मोसमात कमी षटके असताना क्रीजवर आला आहे. त्याने स्वतःच सांगितले आहे की त्याला आता जास्त धावा करण्याची इच्छा नाही. सामन्याच्या नऊ डावात त्याने ९८ धावा केल्या, त्यात त्याचा स्ट्राईक रेट १९६.०० आहे. चेन्नईच्या थालाने ३ चौकार आणि १० षटकार मारले आहेत.”

हेही वाचा: IPL Playoff Equation: दोन्ही रॉयल्स संघांच्या विजयाने एमआय पलटणपुढे मोठे संकट, कसे असेल मुंबईसाठी प्ले ऑफचे समीकरण, जाणून घ्या

‘धोनीवर सर्व काही अवलंबून आहे’- हसी

माईक हसी पुढे म्हणाला, “एक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माझ्या दृष्टिकोनातून तो अजूनही चांगली फलंदाजी करत आहे. तो अजूनही प्रशिक्षण सत्रात येण्यास उत्सुक असतो आणि त्याच्या खेळावर अधिक काम करत आहे. तो बॉल्सला बघून अजूनही चांगले टायमिंगनुसार फटके मारत आहे. त्याच्याकडे अजूनही षटकार मारण्याची क्षमता आहे. जेव्हा तो त्याचा आनंद घेऊन फलंदाजी करत असतो तेव्हा त्याचे संघासाठी असणारे योगदान खूप मोठे असते. जेव्हा तो खराब फॉर्ममध्ये होता तेव्हा तो पुढे जास्त खेळू शकत नाही. मात्र, तरीही त्याचे योगदान कमी होणार नाही, आम्हाला याबाबत पूर्ण विश्वास आहे. तो निवृत्ती कधी घेणार हे सर्व काही फक्त धोनीवर अवलंबून आहे.”

हेही वाचा: IPL2023: “…तर अधिकच्या पैश्यामुळे युवा खेळाडू भरकटू शकतात” के.एल. राहुलचे सूचक विधान

धोनीमुळेच सपोर्ट मिळतो : हसी

धोनी कोणत्याही स्टेडियममध्ये खेळायला गेला तर त्याला प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. जेव्हा तो क्षणभर पडद्यावर येतो तेव्हा संपूर्ण स्टेडियम धोनी-धोनी नावाचा जयघोष सुरु होतो, भले ते विरोधी संघाचे मैदान असो. धोनीमुळे सीएसकेला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना हसी म्हणाला, “सर्वप्रथम आम्हाला एमएसमुळे संघ म्हणून मिळालेला पाठिंबा खूपच मोलाचा असून त्यात आश्चर्यकारक असे काही नाही. मात्र, तसा पाठिंबा मिळायला भाग्य लागत आणि हे सर्वांच्या नशिबी असतच असं नाही. असा पाठिंबा तुम्हाला एक संघ म्हणून खूप उंचीवर नेते आणि एमएस धोनीला मिळालेला पाठिंबा अविश्वसनीय आहे. त्याचा गुडघा सध्या खूप दुखत असला तरी तो अजून काही वर्ष खेळेल असे मला वाटते.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 mike hussey gave a great answer on ms dhonis ipl retirement said we dont know maybe next years avw