MS Dhoni on Retirement: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सध्याच्या आयपीएल हंगामानंतर क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळतो. त्याने शुक्रवारी (२१ एप्रिल) चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविल्यानंतर सांगितले की हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे.
हा माझ्या कारकिर्दीचा शेवटचा टप्पा आहे
सामना जिंकल्यानंतर धोनी जे काही बोलला त्यामुळे चेन्नई आणि धोनीच्या चाहत्यांना थोडा धक्का बसला असेल आणि आता त्यांच्या मनात एकच प्रश्न असेल की धोनीचा हा शेवटचा हंगाम आहे का? मग धोनी असं काय म्हणाला? खरे तर धोनीने हर्षा भोगलेसोबत मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना सांगितले त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा अखेरचा टप्पा आहे.
४१ वर्षीय धोनीने स्वतः कबूल केले की, “मी आणखी किती काळ खेळेन सांगता येत नाही, मला कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. सध्याचा हंगाम धोनीचा शेवटचा आहे आणि आयपीएल २०२३ नंतर तो निवृत्ती जाहीर करेल अशी अनेक अटकळ बांधली जात आहे. धोनी म्हणाला, “मी कितीही काळ खेळलो, चांगली फलंदाजी केली पण शेवटी हा माझ्या कारकिर्दीचा हा शेवटचा टप्पा आहे. कुठलाही दबाव न घेता सामन्याचा आनंद घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. दोन वर्षांनंतर चाहत्यांना इथे येऊन पाहण्याची संधी मिळाली आहे, छान वाटतं. प्रेक्षकांनी आमच्यावर भरभरून प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे.”
काय घडलं सामन्यामध्ये?
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३४ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने ५७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७७ धावांची खेळी केली.
चेन्नईचा मोसमातील चौथा विजय
चेन्नईचा या मोसमातील सहा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. संघाने दोन सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान आणि लखनऊ सुपरजायंट्ससह त्यांचे समान गुण आहेत, परंतु राजस्थानचा धावगती सर्वांमध्ये सर्वोत्तम आहे आणि यामुळे आरआर अव्वल आहे. लखनौ दुसऱ्या तर चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एमएस धोनीने रचला इतिहास
मयंकला स्टंपआउट करून धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनी आपला २४० वा सामना खेळत असताना, विकेटच्या मागे अप्रतिम स्टंपिंग करताना एका फलंदाजाला २०० वेळा बाद करणारा आयपीएल मधील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. याशिवाय, टी२० क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत पहिला यष्टीरक्षक बनला आहे, ज्याने एकूण २०८ झेल पकडले आहेत.