मुंबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय संघ शनिवारी वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा आणि चेन्नईचा महेंद्रसिंह धोनी या कर्णधारांमधील द्वंद्वावर चाहत्यांची नजर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर मुंबईच्या संघाला जवळपास आठवडाभराची विश्रांती मिळाली आहे. या कालावधीत मुंबईच्या खेळाडूंनी कसून सराव केला असला, तरी चेन्नईविरुद्ध विजय मिळवण्यासाठी त्यांना कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागणार आहे. त्यातच घरच्या मैदानावर, आपल्या प्रेक्षकांसमोर हंगामातील पहिला सामना खेळताना विजय मिळवण्याचेही मुंबईच्या संघावर दडपण असेल. परंतु चेन्नईच्या संघात राजवर्धन हंगर्गेकर आणि तुषार देशपांडे यांसारख्या ‘आयपीएल’चा फारसा अनुभव नसलेल्या गोलंदाजांचा समावेश, तसेच वानखेडेची फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी मुंबईच्या पथ्यावर पडू शकेल.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार आणि सलामीवीर रोहितच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. रोहितला ‘आयपीएल’च्या गेल्या तीन हंगामांमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.  त्यामुळे मुंबईला यशस्वी ठरायचे असल्यास रोहितने फलंदाज म्हणून कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, धोनीने पहिल्या दोन सामन्यांत काही मोठे फटके मारले आणि कर्णधार म्हणून गोलंदाजांचा चांगला वापर केला. चेन्नईसाठी यंदाच्या हंगामाची संमिश्र सुरुवात झाली आहे. पहिल्या लढतीत गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नईने दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर मात केली. आता चेन्नईचा संघ मुंबईला नमवत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल, तर मुंबईचा पहिल्या विजयाचा प्रयत्न असेल.

’ वेळ : सायं. ७.३० वाजता

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

सूर्यकुमारच्या कामगिरीवर लक्ष

वानखेडेच्या फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून देणे गरजेचे आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादववर मुंबईची भिस्त असेल. सूर्यकुमारला गेल्या काही काळात धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे त्याला लवकरच सूर गवसेल अशी मुंबईला आशा असेल.

ऋतुराजला रोखण्याचे आव्हान

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पहिल्या दोन सामन्यांत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने सलामीच्या लढतीत गुजरातविरुद्ध ५० चेंडूंत ९२ धावांची, तर लखनऊविरुद्ध ३१ चेंडूंत ५७ धावांची खेळी साकारली. त्यामुळे त्याला रोखण्याचे मुंबईसमोर आव्हान असेल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 mumbai indians vs chennai super kings match prediction zws