भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी क्रिकेट संचालक म्हणून संबंधित आहेत. आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी गांगुली टीमच्या उर्वरित सपोर्ट स्टाफसह दिल्लीच्या खेळाडूंना तयार करत आहे. दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वी शॉने तो भारतीय संघात खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे.
गांगुली म्हणाला की, “कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मुंबईच्या फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष ठेवले पाहिजे अशी मला पूर्ण आशा आहे.” या मुलाखतीत गांगुलीने आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आगामी एकदिवसीय विश्वचषक संबंधित प्रश्नांवर आपले मत मांडले. दरम्यान, पृथ्वी शॉशी संबंधित प्रश्नावर त्याने त्याला टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे घोषित केले.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, “मला समजले आहे की पृथ्वी शॉ भारतीय संघासाठी खेळण्यास तयार आहे. पण त्याला संधी कधी मिळणार, आता त्यांचा स्लॉट मिळतो की नाही, तो कधी खाली होणार? यावर सर्वकाही अवलंबून आहे. मला खात्री आहे की रोहित शर्मा आणि निवड समिती त्याच्यावर बारीक लक्ष ठेवतील. तो एक अप्रतिम खेळाडू आहे टीम इंडियात आता संधी द्यायला हवी.”
याशिवाय गांगुली ऋषभ पंतशी संबंधित प्रश्नही विचारण्यात आला होता. त्याला विचारण्यात आले की पंत आता दुखापतग्रस्त आहे आणि भारताला लवकरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक खेळायचे आहे, त्यामुळे पंत संघात नसल्यास काही अडचण येईल का? यावर गांगुली म्हणाला, “ऋषभ पंत हा खास खेळाडू आहे आणि तुम्हाला त्याच्यासारखा खेळाडू सहजासहजी सापडणार नाही. पण मला वाटते इशान किशन हा देखील चांगला खेळाडू आहे. जोडीला केएस भरत देखील आहे. साहजिकच ते वेगळ्या पद्धतीने खेळतात. हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्यामुळे त्यांना तुम्ही एका तराजूत मोजू शकत नाहीत. संघात संधीं मिळताच हे यष्टिरक्षक फलंदाज म्हणूनही चांगले खेळतील. इशान किशन, तो छोट्या फॉरमॅटमध्ये काय करू शकतो हे आपण पाहिले आहे.”
गांगुलीने केएल राहुलला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाठिंबा दिला. तो म्हणाला, “केएल राहुलने एकदिवसीय सामन्यांमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची सरासरी ४५ टक्के आहे, जी कौतुकास्पद आहे. तो एक चांगला एकदिवसीय खेळाडू आहे आणि जर तो अशी कामगिरी सातत्याने करू शकला तर मला भारतासमोर कोणतीही अडचण दिसत नाही.”
शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०२१ मध्ये खेळला गेला होता
आम्ही तुम्हाला सांगतो की पृथ्वी शॉने टीम इंडियासाठी शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला असला तरी त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले नाही. पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. मात्र, त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्याने ५ कसोटीत ४२.३८ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३४ आहे. त्याचबरोबर त्याने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये १८९ धावा केल्या आहेत. शॉने एकमेव टी२० सामन्यात शून्य धावा केल्या आहेत, तर आयपीएलच्या ६३ सामन्यांमध्ये त्याने १५८८ धावा केल्या आहेत.