रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कार्यवाहक कर्णधार विराट कोहलीने सलग दोन सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आयपीएलमध्ये १८ महिन्यांनंतर पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध सामन्यात नेतृत्व केले. मात्र, दरम्यान कोहली आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. रविवारी (२३ एप्रिल) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात षटकाचा वेग कमी ठेवल्याबद्दल विराटला दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याची मैदानावरील आक्रमकता यावरही आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल कारवाई करण्याची शक्यता आहे.
यावेळी हा दंड केवळ संघाच्या कर्णधारालाच नाही तर संपूर्ण संघाला लावण्यात आला आहे. कोहलीला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर आरसीबीच्या इतर खेळाडूंनाही ही शिक्षा झाली भोगावी लागत आहे. त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के कपात करण्यात आली आहे. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आरसीबी संघ राजस्थानविरुद्ध वेळेवर पूर्ण षटके टाकू शकला नाही. संघाने हंगामात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.”
लखनऊविरुद्धच्या सामन्यातही चूक केली
विराटवर २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग-११ च्या इतर खेळाडूंना प्रत्येकी ६ लाख रुपये किंवा सामन्याच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसला दंड ठोठावण्यात आला होता. संघाच्या दुसऱ्या चुकीमुळे यावेळी मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. आता संघाने पुन्हा एकदा ही चूक केली तर कर्णधारावर एक किंवा अधिक सामन्यांची बंदी घातली जाऊ शकते.
अशा परिस्थितीत विराटने आगामी सामन्यात कर्णधारपद भूषवल्यास त्याला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्याला मोठी शिक्षा होऊ शकते.किंग कोहली हा सामन्यात काही वेळेस खूप आक्रमक होतो. तो त्याचा आनंदावर ताबा ठेवू शकत नाही. त्यामुळे यावरही आयपीएल कारवाई करण्याची शक्यता आहे.
काय घडलं सामन्यामध्ये?
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने नऊ गडी गमावून १८९ धावा केल्या. फाफ डुप्लेसिसने ६२ आणि मॅक्सवेलने ७७ धावा केल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ सहा गडी गमावून केवळ १८२ धावा करू शकला. देवदत्त पडिक्कलने ५२ आणि यशस्वी जैस्वालने ४७ धावा केल्या. शेवटी ध्रुव जुरेलने १६ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीकडून हर्षल पटेलने तीन बळी घेतले.