पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला मंगळवारी (२५ एप्रिल) आयपीएलमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला एक खास सल्ला दिला आहे. “मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने काही दिवस आयपीएलमधून ब्रेक घ्यावा”, असे ते म्हणाले.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही गेल्या वर्षी काही दिवस विश्रांती घेतली होती. तो फ्रेश होऊन परतला ते जबरदस्त फॉर्म घेऊनच. मुंबईविरुद्ध रोहित शर्मा आठ चेंडूत दोन धावा काढून बाद झाला. रोहितने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर (WTC) अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला गावसकर त्यांनी हिटमॅनला दिला.
सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला दिला सल्ला
गावसकर म्हणाले, “मला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी क्रमवारीत काही बदल पाहायला आवडतील. खरे सांगायचे तर, रोहितने यावेळी विश्रांती घ्यावी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे, असे मी म्हणेन. यामुळे तो शानदार पुनरागमन करू शकतो. फलंदाजीत पुन्हा आम्हाला जुना रोहित शर्मा पाहण्याची इच्छा आहे. आता त्याने स्वतःला सावरले पाहिजे. सध्या तो मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार असल्याने थोडा काळजीत दिसतो आहे. त्याने थोडे दडपण घेतले असावे असे मला वाटते.”
माजी कर्णधार लिटल मास्टर पुढे म्हणाले, “कदाचित यावेळी तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल विचार करत असेल. मात्र, याबाबत मला माहिती नाही. मला वाटतं त्याला विश्रांतीची गरज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तंदुरस्त राहण्यासाठी त्याने मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या दोन-तीन सामन्यांमध्ये खेळावे.
गेल्या वेळी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध जेतेपदाच्या लढतीत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ हंगामात टीम इंडियाने चमकदार कामगिरी करत गुणतालिकेत ते ऑस्ट्रेलियाच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघाची निवड
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव यादव.