Rohit Sharma on Harsha Bhogle: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने रविवारी मुंबई येथे आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवून संघाला विजयी मार्ग दाखवला. २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने १९.३ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१४ पर्यंत मजल मारली. सूर्यकुमारने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक नोंदवले, त्याने २९ चेंडूत ५५ धावा फटकावल्या, तर डेव्हिडने १४ चेंडूत नाबाद ४५ धावा फटकावल्या. ग्रीननेही २६ चेंडूंत ४४ धावा केल्या आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे मुंबईला वानखेडेवर विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्यात मदत झाली.
सुरुवातीला राजस्थानने २० षटकात ७ बाद २१२ धावा केल्या, यशस्वी जैस्वालने शतक ठोकले. आरआरच्या सलामीवीराने ६२ चेंडूत १२४ धावा केल्या, मात्र त्याचे दमदार शतक व्यर्थ गेले. अर्जुन तेंडुलकरच्या जागी संघात आलेला अर्शद खान मुंबईसाठी चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याने तीन बळी घेतले, तर पियुष चावलाने देखील दोन गडी बाद केले.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी वाढदिवसाची ही उत्तम भेट होती. रोहित त्याच्या विनोदी आणि उत्स्फूर्त उत्तरांसाठी ओळखला जातो, त्याच्याबाबतीत सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत आणखी एक मजेशीर किस्सा घडला. प्रख्यात समालोचक आणि प्रसारक हर्षा भोगले यांनी रोहितचे ३६व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले, परंतु मुंबईच्या कर्णधाराने दिलेल्या मजेशीर प्रतिसादामुळे सगळीकडे हशा पिकला.
रोहितशी बोलताना हर्षा भोगले म्हणाले, “आज सगळं जमून आल. कर्णधार म्हणून १५० वा सामना, मुंबईसाठी १९० वा सामना, ३६वा वाढदिवस आणि गेल्या वर्षी घडल्याप्रमाणे सगळ झालं.” तर यावर रोहित म्हणाला, “वाढदिवस ३५वा, ३६ नाही.” यावर बोलताना हर्षा म्हणाले, “ अरे वाह, तुला अजून एक वर्ष मिळाले. चांगली सुधारणा आहे.” तर रोहित यावर म्हणाला की, “३६वा आहे मी फक्त गंमत करत होतो.” यावर सगळ्यांनाच हसू अनावर झाले.
रोहितला पुढील सामन्यात फॉर्म शोधण्याचे आव्हान असणार आहे कारण, तो राजस्थानविरुद्ध ५ चेंडूत फक्त ३ धावा करू शकला. या विजयानंतर, मुंबई आता आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह आठ गुण झाले असून आयपीएल क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. इथून पुढे, प्रत्येक सामना मुंबईसाठी महत्त्वपूर्ण बनतो आणि रोहित त्यांच्या पुढील सामन्यात बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध ही विजयी मालिका कायम ठेवण्याचे प्रयत्न करताना दिसेल.
हेही वाचा: IPL 2023: “अरे माझा फोन…”, रोहित शर्मा सोबत सेल्फी घेणं चाहत्याला पडलं महागात, पाहा Video
रोहितने डेव्हिड आणि माजी स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड यांच्यातील तुलनेवरही भाष्य केले. तो म्हणाला, “पॉलीने इतक्या वर्षांत आमच्यासाठी अनेक चॅम्पियनशिप जिंकल्या. पण संघामध्ये खूप क्षमता आणि सामर्थ्य आहे. शेवटी, तिच शक्ती गोलंदाजाला विचारात ठेवते.” जैस्वालच्या खेळाबद्दल, रोहित पुढे म्हणाला, “मी त्याला मागच्या वर्षी पाहिलं होतं, या वर्षी त्याने आपला खेळ एका नवीन स्तरावर नेला आहे. मी त्याला विचारलं की एवढी ताकद कुठून येते, तो म्हणतो की. ‘तो जिममध्ये वेळ घालवतो, फिटनेसवर खूप काम करतो.’ खरोखर त्याच्यासाठी, भारतीय क्रिकेटसाठी आणि राजस्थानसाठीही ही चांगली बाब आहे.”