हैदराबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा सामना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी सनरायजर्स हैदराबादशी होणार असून,‘प्ले-ऑफ’मधील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना या सामन्यात विजय अनिवार्य आहे.

बंगळूरुचा संघ १२ सामन्यांत १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यांना ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे गरजेचे आहे. त्यासाठी संघाला चमकदार कामगिरीशिवाय पर्याय नाही. हैदराबाद संघाचे १२ सामन्यांत ८ गुण असून ते ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. मात्र, तरीही हैदराबादचा संघ बंगळूरुला रोखण्याचा प्रयत्न करेल.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

बंगळूरुची मदार फलंदाजांवर

कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिससह कोहलीने बंगळूरुसाठी या सत्रात सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र, सलग दोन सामन्यांतील अपयशानंतर कोहलीचा प्रयत्न हैदराबादविरुद्ध चांगल्या कामगिरीचा असेल. डय़ूप्लेसिसने १२ सामन्यांत ५७.३६च्या सरासरीने ६३१ धावा केल्या असून तो सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रस्थानी आहे तर, कोहलीने ३९.८१च्या सरासरीने ४३८ धावा केल्या आहेत. कोहलीच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव दिसत आहे. या दोघांशिवाय ग्लेन मॅक्सवेलकडून संघाला अपेक्षा असतील. मॅक्सवेलने आतापर्यंत पाच अर्धशतके झळकावली आहेत. या तिघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यातील विजयानंतर संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल.

त्रिपाठी, मार्करमकडून अपेक्षा

हैदराबादचा संघ ‘आयपीएल’च्या हंगामातून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला. त्यामुळे या सामन्यात हैदराबादचा संघ आपल्या आत्मसन्मानासाठी खेळेल. हैदराबादचा प्रयत्न उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवत चाहत्यांना आनंद देण्याचा असेल. गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही आघाडय़ांवर संघाला या सत्रात चमक दाखवता आली नाही. फलंदाज हेन्रिक क्लासेन, राहुल त्रिपाठी वगळता इतर कोणालाही फारसे योगदान देता आले नाही. कर्णधार एडीन मार्करमच्या खराब लयीचा फटका संघाला बसला आणि त्यामुळे संघाच्या अडचणी वाढल्या.

Story img Loader