बंगळूरु : पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचे लक्ष्य रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात विजयी प्रारंभाचा असेल. तर, दुसरीकडे बंगळूरुचा प्रयत्न आपले वर्चस्व कायम राखण्याचे असेल. ‘आयपीएल’ २०२० नंतर बंगळूरुने मुंबईविरुद्ध झालेल्या पाच पैकी तीन सामन्यांत विजय मिळवले आहेत. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळूरुला घरच्या चाहत्यांचा पाठिंबाही मिळेल.
रोहित, सूर्यकुमारवर मुंबईची भिस्त
‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात मुंबईला १४ पैकी ४ सामने जिंकण्यात यश मिळाले होते. त्यामुळे ते गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिले. ‘आयपीएल’ इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. त्यामुळे गेल्या हंगामातील कामगिरीला मागे सारून नव्या दमाने संघाला सुरुवात करावी लागेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व झाय रिचर्डसन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत संघाच्या गोलंदाजीची मदार ही इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरवर असेल. संघासाठी धावा करण्याची भिस्त कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. तसेच, इशान किशनकडूनही संघाला आक्रमक खेळीची अपेक्षा असेल. संघाकडे तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, टीम डेव्हिडसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. तसेच, कॅमेरून ग्रीनही आक्रमक फटके मारण्यास सक्षम आहे.
डय़ूप्लेसिस, विराटकडून अपेक्षा
बंगळूरुच्या संघाला या हंगामात दुखापतींचा फटका बसला आहे. रजत पाटीदार व जोश हेझलवूडसारख्या खेळाडूंना दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यातील सामन्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेलही पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. संघाच्या शीर्ष फळीची जबाबदारी कर्णधार फॅफ डय़ूप्लेसिस आणि विराट कोहली यांच्या खांद्यावर असेल. गोलंदाजीची धुरा हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज सांभाळतील.
’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, ३, १ हिंदी, जिओ सिनेमा