Punjab Kings vs Delhi Capitals Score Updates: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बुधवारी झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२३च्या ६४ व्या सामन्यात दिल्लीने पंजाबचा १५ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार शिखर धवनने आपली चूक मान्य केली की, हरप्रीत ब्रारला शेवटचे षटक टाकणे त्याला महागात पडले. याशिवाय त्याने गोलंदाजांनावर खापर फोडत त्यांना चांगलीच समज दिली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २१३ धावा केल्या होत्या, या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबचा संघ केवळ १९८ धावांपर्यंत मजल मारू शकला. लियाम लिव्हिंगस्टोनने यजमान संघासाठी ९४ धावांची तुफानी खेळी खेळली पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
या पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन म्हणाला, “हा पराभव आमच्या खूप जिव्हारी लागणारा आहे कारण, प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी ही सुवर्ण संधी होती. यामुळे मी खूप निराश झालो आहोत. पहिल्या सहा षटकांमध्ये आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही, चेंडू ज्या प्रकारे स्विंग होत होता, आम्ही काही विकेट्स घ्यायला हव्या होत्या. अटीतटीच्या सामन्यात छोट्या-छोट्या चुका सुद्धा खूप महागात पडतात. इशांत शर्माच्या नो बॉलनंतर आम्हाला आशा होती, लिव्ही (लियाम लिव्हिंगस्टोन) ने शानदार खेळी खेळली, दुर्दैवाने आम्ही दुसऱ्या बाजूने सतत विकेट्स पडत गेल्याने मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरलो. शेवटच्या षटकात फिरकी गोलंदाजी करण्याचा माझा निर्णय हा माझ्यावरच उलटला. तिथून गाडी रुळावरून सरकली ती पुन्हा येऊ शकली नाही. वेगवान गोलंदाजांना १८-२० धावांचा फटका बसला होता. ती दोन षटके आम्हाला महागात पडली आणि तिथेच आमचा पराभव झाला.”
तो पुढे म्हणाला, “आमच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये चेंडू पुढे टाकला नाही. जर चेंडू पुढे गुड लेंथवर टाकला असतात तर तो स्विंग झाला असता आणि आम्हाला विकेट्स मिळाल्या असत्या. हीच योजना होती आणि दुर्दैवाने ते अंमलात आणू शकले नाहीत. अशा प्रकारच्या खेळपट्टीवर, आम्हाला विकेट मिळो किंवा न मिळो, आम्हाला योग्य ठिकाणी गोलंदाजी करणे आवश्यक आहे जे आम्ही बऱ्याच काळापासून करत नाही. हे मला दुःखी करत आहे. सोडलेले झेल आणि खराब क्षेत्ररक्षण हे ही तितकेच जबाबदार आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात पॉवर प्लेमध्ये ५०-६० धावा देत आहोत, आम्ही विकेट्सही घेतल्या पाहिजेत. १-२ षटके स्विंग होतील हे आम्हाला माहीत होते. आम्ही दुसऱ्या षटकात पहिली विकेट गमावली, मी बाद झालो आणि पहिले षटकही मेडन गेले, आम्ही तिथे सहा चेंडू गमावले.”
या पराभवानंतर पंजाब किंग्जच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. वास्तविक, आता पंजाब किंग्स त्यांचा शेवटचा सामना जिंकून जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत जाऊ शकतात, जे या वर्षी प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अपुरे असेल. अधिकृतपणे ते अजूनही स्पर्धेतून बाहेर पडलेले नाहीत.