Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Score Updates: आयपीएलच्या २०२३ च्या १४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा आठ विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मिळवलेल्या या विजयासह सनरायझर्सने मोसमातील आपले खाते उघडले. तीन सामन्यांमधला हा त्याचा पहिला विजय आहे. दुसरीकडे पंजाबला तीन सामन्यांत प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने शिखर धवनच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर २० षटकांत ९ गडी बाद १४३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघाने राहुल त्रिपाठीच्या नाबाद ७४ धावांच्या जोरावर १७.१ षटकात २ बाद १४५ धावा करत सामना जिंकला.
राहुल त्रिपाठीने अर्धशतकी खेळी खेळून सामना एकतर्फी केला –
सनरायझर्ससाठी राहुल त्रिपाठीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ४८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १० चौकार आणि तीन षटकार मारले. कर्णधार एडन मार्कराम २१ चेंडूत ३७ धावा करून नाबाद राहिला. त्याने सहा चौकार मारले. त्रिपाठी आणि मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मयंक अग्रवाल २० चेंडूत २१ धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूकने १४ चेंडूत १३ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
धवनने पंजाबचा डाव सावरला –
पंजाब किंग्जने ६९ धावांपर्यंत आपला निम्मा संघ गमावला होता, त्यानंतर शिखर धवन एका बाजूने संघाची धावसंख्या वाढवत राहिला, तर दुसऱ्या बाजूकडून विकेट्स पडण्याची प्रक्रिया सातत्याने पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला, ज्यामध्ये कर्णधार धवनच्या बॅटमधून ९९ धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली. पंजाबच्या ९ फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. मोहित राठीसह धवनने अखेरच्या विकेटसाठी ५५ धावांची शानदार भागीदारी केली.
हैदराबादसाठी या सामन्यात लेगस्पिनर मयंक मार्कंडेने आपल्या गोलंदाजीत केवळ १५ धावा देत ४ षटकात ४ बळी घेतले. याशिवाय उमरान मलिक आणि मार्को यान्सिन यांनी २-२ विकेट्स आपल्या नावावर केल्या.