हैदराबाद : सनरायजर्स हैदराबादसमोर गुरुवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. या सामन्यात हैदराबादच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर कामगिरीत सुधारणा करण्यासाठी दडपण असेल.
हैदराबाद आणि कोलकाता या दोनही संघांत तारांकित खेळाडूंचा समावेश असला, तरी त्यांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. कोलकाता (नऊ सामन्यांत) आणि हैदराबाद (आठ सामन्यांत) या दोनही संघांचे केवळ सहा गुण आहेत. परंतु सरस निव्वळ धावगतीमुळे कोलकाता आठव्या, तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानी आहे. त्यामुळे गुणतालिकेत वरील स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा ठरेल.
’ वेळ : सायं. ७.३० वाजता
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा
मार्करम, त्रिपाठीकडून निराशा
हैदराबादच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गेल्या सामन्यात अभिषेक शर्माने सलामीला येताना आक्रमक अर्धशतक साकारले होते. तसेच हेन्रिक क्लासनने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली होती. मात्र, मयांक अगरवाल, हॅरी ब्रूक आणि कर्णधार एडीन मार्करम या फलंदाजांना एक-दोन खेळी वगळता चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच गेल्या हंगामात दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या राहुल त्रिपाठीने यंदा मात्र निराशा केली आहे. या फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे.
रसेल कामगिरी उंचावणार? कोलकाता संघासाठी जेसन रॉय आणि रहमनुल्ला गुरबाझ यांनी सलामीला चांगली कामगिरी केली आहे. परंतु गेल्या चार सामन्यांत कोलकाताने या दोघांपैकी एकाचीच संघात निवड केली. आता डेव्हिड व्हिजाला वगळून या दोघांनाही खेळवण्याचा पर्याय कोलकाताकडे उपलब्ध आहे. अष्टपैलू आंद्रे रसेलला यंदा अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजीत २०च्या सरासरीने केवळ १४२ धावा, तर गोलंदाजीत केवळ सहा बळी मिळवण्यात रसेलला यश आले आहे. त्याने कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.