आयपीएलच्या १६व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. पहिला सामना ३१ मार्च रोजी चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यावर्षी जगातील दोन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्स चेन्नई या एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. जडेजा गेल्या अनेक हंगामांपासून सीएसके सोबत जोडला गेला आहे, तर स्टोक्सला चेन्नईने या वर्षाच्या सुरुवातीला मिनी-लिलावात १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
आता एका प्रशिक्षण सत्रात या दोघांसोबत सराव करतानाचे चित्र समोर आले आहे. काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी या चित्राची तुलना गेल्या वर्षी फिफा विश्वचषकापूर्वी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी यांच्याशी केली आहे. तसेच रोनाल्डो आणि मेस्सी एकाच संघात खेळत असल्याचे दिसते.
चेन्नई सुपर किंग्सनेही त्यांच्या ट्विटर हँडलवर जडेजा आणि स्टोक्सचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हायप जो है वो सच नहीं लगा है”, पण चित्र अगदी खरे आहे. गेल्या वर्षी जडेजाला सीएसकेचा कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि धोनी पुन्हा कर्णधार झाला. धोनी यंदाही कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्याचबरोबर भविष्यात स्टोक्सकडे संघाचा कर्णधार म्हणून विचार केला जात आहे. चेन्नईने यंदाच्या मिनी लिलावात सॅम करणला विकत घेण्याचाही प्रयत्न केला, पण किंमत १५.२५ कोटींच्या वर गेल्याने चेन्नईने माघार घेतली. मात्र, स्टोक्सला संघाने १६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.
“एमएस धोनीकडे वेगळ्या प्रकारची कला आहे”- धवन
शिखर धवन हा एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. २०१३मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यात शिखर धवन याचा मोलाचा वाटा होता. माध्यमांशी बोलताना त्याला धोनीबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा तो म्हणाला की, “धोनी भाईची उपस्थिती खूप मजबूत आहे. प्रत्येक गोष्ट चांगल्या परफॉर्मन्सनेच व्हावी हे गरजेचे नाही. त्याच्याकडे जो अनुभव आहे आणि ज्याप्रकारच्या तो हालचाली करतो, ते शानदार असतात. ज्याप्रकारे दबावातील परिस्थितीत त्याच्याकडे जी स्थिरता असते आणि तो विचारपूर्वी निर्णय घेतो, ते प्रशंसनीय आहे. त्यामुळेच तो इतका यशस्वी कर्णधार आहे.”
खरं तर, एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या तीन ट्रॉफी नावावर केल्या आहेत. तसेच, संघाला कसोटीतही अव्वल बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. याव्यतिरिक्त धोनीने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्स संघाला ४ वेळा चॅम्पियन बनवले आहे. आता पाचव्या विजेतेपदासाठी तो ३१ मार्चपासून आयपीएल २०२३मध्ये खेळताना दिसणार आहे.