IPL 2023: आयपीएल २०२३च्या २०व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव करून मोसमातील आपला दुसरा विजय नोंदवला. या मोसमातील दिल्लीचा हा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात विराट कोहलीने आरसीबीसाठी ३४ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी खेळली. मात्र या संपूर्ण सामन्यादरम्यान विराट कोहलीची आक्रमकता वेगळ्याच पातळीवर होती. अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याचे सेलिब्रेशन असो किंवा कॅच घेतल्यानंतर दिल्ली डगआऊटकडे एक टक लावून पाहणे असो. इतकंच नाही तर मॅचनंतर जेव्हा हस्तांदोलन होत होते, त्यावेळी जे घडलं त्यामुळे विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील जुना वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आला.
खरं तर, सामन्यानंतर विराट कोहलीने सर्वांशी हस्तांदोलन केले पण दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुलीकडे दुर्लक्ष केले, त्याने दादाशी हस्तांदोलन केले नाही. विराट हस्तांदोलन करत रिकी पाँटिंगशी बोलताना दिसला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर पुन्हा एकदा गांगुली आणि विराटमधील कर्णधारपदाच्या वादाची चर्चा चर्चेत आली. व्हिडिओच्या १३व्या सेकंदात विराट सौरव गांगुलीकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विराट जेव्हा येतो तेव्हा सौरव थांबतो, सर्वांशी हस्तांदोलन करतो, मात्र विराट कोहली बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांकडे ढुंकूनही पाहत नाही.
एवढेच नाही तर या सामन्यादरम्यान अशा अनेक घटना घडल्या, त्यानंतर यांच्यातील वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक मीम्स आणि व्हिडिओ समोर येऊ लागले. या सामन्यात ३३ चेंडूत ५० धावा करत विराट कोहली एका वेगळ्याच स्तरावर सेलिब्रेशन करत होता, तो खूपच आक्रमक दिसला. यानंतर क्षेत्ररक्षणातही तो जबरदस्त ऊर्जेने झेल घेत होता. आरसीबीच्या गोलंदाजीदरम्यान, त्याने सीमारेषेवर अमन खानचा झेल घेताना दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्याकडे नजर रोखून पाहिले.
काय होता संपूर्ण वाद?
खरं तर, २०२१ मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी विराट कोहलीने बंगळुरू आणि भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्याला वन डे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. याबाबत विराटने सांगितले की, “आपण वन डे संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, मात्र हा निर्णय बोर्डाने घेतला आहे. तसेच गांगुलीने विराटला विचारपूर्वक हा निर्णय घेण्यास सांगितले होते. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत याचा इन्कार केला आणि त्यांच्याशी कोणतेही असे बोलणे झाले नाही,” असे सांगितले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. येथूनच सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वाद चर्चेचा विषय बनला आहे.