IPL 2024, Punjab Kings vs Mumbai Indians: आशुतोष शर्माने पंजाब किंग्सकडून खेळताना सातत्याने कामगिरी करत आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. पंजाब किंग्सची कामगिरी या मोसमात साधारण राहिली असली तरी आशुतोष शर्माने मात्र सर्वांची मनं जिंकली आहेत. मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात वादळी फलंदाजी करत त्याने संघावर दबाव आणला पण थोडक्यासाठी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मुंबईविरूद्धच्या ६१ धावांच्या खेळीसह आशुतोषने आयपीएलट्आ १७ वर्षांच्या इतिहासातील मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात आशुतोषला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ८व्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने आतापर्यंत ४ डाव खेळले आहेत. या दरम्यान आशुतोषने आतापर्यंत ५२ च्या सरासरीने १५६ धावा केल्या आहेत, तर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्या ६१ धावांची शानदार खेळी केली.

आशुतोष शर्मा आयपीएलच्या १७ वर्षांच्या इतिहासात ८व्या क्रमांकावर खेळताना एका हंगामात १०० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राशिद खाननंतर आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा आशुतोष हा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या मोसमात राशिद खानने ८व्या क्रमांकावर किंवा त्याखालील स्थानावर फलंदाजी करताना १०० हून अधिक धावा केल्या होत्या.

आशुतोषने या मोसमात आतापर्यंत ४ डावांमध्ये २०५.२६ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि १३ षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या हंगामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावादरम्यान पंजाब किंग्ज संघाने आशुतोषला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह संघाचा भाग बनवले.

आशुतोष शर्मा २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वे संघाचा भाग होता. ज्यामध्ये त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात फक्त ११ चेंडूत अर्धशतक झळकावून टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा युवराज सिंगचा विक्रम मोडला. आशुतोषने या सामन्यात १२ चेंडूत ८ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ५३ धावांची खेळी खेळली.

आशुतोषच्या T20 कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत १९ सामन्यांमध्ये ३३.८२ च्या सरासरीने ५७५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ५ अर्धशतकांचाही समावेश आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील २००च्या जवळ राहिला आहे.

Story img Loader