IPL 2024 Points Table: आयपीएल २०२४ च्या ५१ व्या सामन्यात कोलकाताने मुंबईचा ५१ धावांनी सहज पराभव केला. या पराभवासह केकेआरने तब्बल १२ वर्षांनी वानखेडेच्या मैदानात मुंबईवर मोठा विजय मिळवला. केकेआरने मागे पडल्यानंतरही सामन्यात चांगले पुनरागमन केले, तर घरच्या मैदानावर खेळत असूनही मुंबईने पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केले आहे. संपूर्ण षटकेही न खेळता मुंबईचा संघ १६९ धावांच्या लक्ष्यासमोर १४५ धावा करत सर्वबाद झाला. आता या लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफ गाठणार का जाणून घ्या.
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, केकेआर संघाची सुरुवात खूपच खराब झाली, ज्यामध्ये त्यांनी ७ धावांवर फिल सॉल्टच्या रूपात त्यांची पहिली विकेट गमावली. तर संघाचे टॉप-५ फलंदाजही जास्त वेळ टिकू शकले नाहीतय अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, सुनील नरेन आणि रिंकू सिंग यांनीही विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारणे कठीण वाटत होते. पण व्यंकटेश अय्यर (७०) आणि मनिष पांडेच्या (४२) भागीदारीच्या जोरावर केकेआऱ १६९ धावांचा आकडा गाठला.
मुंबईचीही सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सूर्याच्या ५६ धावांच्या तुफान खेळीनेसुध्दा मुंबईला पराभवापासून वाचवले नाही. यासह मुंबईचा संघ ११ सामन्यातील ८ पराभवांसह सहा गुण मिळवत आयपीएल २०२४ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. आता मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जर तर आणि गणितीय समीकरणांचा आधार आहे.
मुंबई इंडियन्सचे अजून तीन सामने बाकी आहेत, या तिन्ही सामन्यात मुंबईने जर विजय मिळवला तरी संघ फार फार तर १२ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. त्यातही मुंबईचा संघ नेट रन रेटमध्येही मागे आहे. मुंबईला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थान आणि कोलकाताचा संघ सर्वाधिक गुणांसह पहिल्या दोन स्थानी आहे.