चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे गेल्या दोन हंगामांतील विजेते संघ आज, मंगळवारी ‘आयपीएल’च्या लढतीत आमनेसामने येणार असून या वेळी ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या नव्या कर्णधारांची कसोटी लागणार आहे.
यंदाच्या हंगामापूर्वी दोन्ही संघांना नव्या कर्णधाराची निवड करणे भाग पडेल. हार्दिक पंडया मुंबईकडे परतल्याने गुजरात संघाचे नेतृत्व गिलकडे आले. दुसरीकडे, यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याच्या २४ तासांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडताना आपला उत्तराधिकारी म्हणून ऋतुराजला निवडले. या दोनही नव्या कर्णधारांना आपापले पहिले सामने जिंकण्यात यश आले.
हेही वाचा >>> IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?
चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमध्ये तारांकितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तगडया प्रतिस्पर्धीला रोखणे हे दोन्ही नव्या कर्णधारांसमोरील आव्हान असेल. चेन्नईचा संघ हा सामना घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. चेन्नईने सलामीचा सामनाही आपल्या मैदानावर खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला नमवले होते.
गुजरातने मुंबई इंडियन्सला पराभूत करत यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. आता कामगिरीत सातत्य राखतानाच गेल्या हंगामाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची परतफेड करण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल. २४ वर्षीय गिल यंदाच्या ‘आयपीएल’मधील सर्वात युवा कर्णधार आहे.
* वेळ : सायं. ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा