IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. केकेआरच्या २७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ १०६ धावांनी पराभूत झाला. या दारुण पराभवानंतर दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने निराशा व्यक्त केली. सामन्यानंतर बोलताना पॉन्टिंगने केकेआरच्या वादळी कामगिरीचे कौतुक केले आणि त्याच्या संघाची कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. अनेक गोष्टी आहेत ज्यात संघाला सुधारणा करणे आवश्यक आहे, असे त्याचे मत आहे.
डीसीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग म्हणाले, “आत्ताच सर्व गोष्टींचे परीक्षण करणे कठीण आहे. सामन्याच्या सुरूवातीला संघ ज्याप्रकारे खेळला, ते माझ्यासाठी खूपच ओशाळवाणं होतं. आम्ही खूप धावा दिल्या, ज्यामध्ये १७ वाइड चेंडू टाकले. २० षटके टाकण्यासाठी आम्हाला दोन तास लागले, ज्यामुळे आम्ही वेळेनुसार दोन षटके मागे होतो. याचा अर्थ शेवटची दोन षटके टाकणाऱ्या खेळाडूंना वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांसह गोलंदाजी करावी लागली. या सामन्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ज्या अस्वीकार्य आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल आम्ही ड्रेसिंग रूममध्ये खुलेपणाने संवाद साधू.”
पॉन्टिंग म्हणाला, “केकेआरने पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरुवात केली. ६ षटकांनंतर ते जवळपास ९० धावांवर होते. ही सुरूवात आमच्यासाठी अजिबातच चांगली नव्हती. सामन्याच्या सुरूवातीला जर असे घडत असेल तर तुम्ही पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करता आणि त्यांनी तेच आम्हाला करू दिले नाही. केकेआर सुरुवातीपासूनच आक्रमकपणे खेळत होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या त्या युवा खेळाडूने (अंगक्रिश रघुवंशी) खरंच चांगली कामगिरी केली. त्याच्यामुळेच रसेल आणि इतर खेळाडू मोकळेपणाने त्यांचा नेहमीप्रमाणे खेळू शकले. आणि त्यांच्या हातात विकेट्स होत्या, त्यामुळे ते तुफान फटकेबाजी करत होते. त्यांनी बऱ्याच गोष्टी खरोखर चांगल्या केल्या पण आम्हाला आमच्या स्वतःच्या कामगिरीचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि आम्हाला पुढील सामन्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल, हे पाहावे लागेल.”
केकेआरविरूद्धच्या या मोठ्या पराभवामुळे दिल्ली संघाचा नेट रन रेट खूपच कमी झाला आहे आणि ते सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. त्यांचा पुढील सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरूद्ध होणार आहे.