IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा २० धावांनी दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या २०७ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ६ बाद १८६ धावाच करू शकला. मुंबईच्या पराभवामुळे रोहित शर्माचे झंझावती शतक व्यर्थ गेले. रोहित शर्माने ६१ चेंडूत १०० धावा केल्या. पण पाथिरानाच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे इतर फलंदाज टिकू शकले नाहीत. पाथिरानाने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत चार विकेट घेतले. सूर्यकुमार यादवला शून्यावर बाद करणं, ही चेन्नईसाठी महत्त्वाची गोष्ट ठरली.
– quiz
रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईचा संघ आणि पाथिरानाची गोलंदाजी मुंबईवर भारी पडली. धोनीच्या अखेरच्या षटकातील ३ षटकारांच्या जोरावर संघाने २०७ धावांचा आकडा गाठला. चेन्नईच्या डावात मुंबईसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हार्दिकच्या षटकात एकूण २६ धावा झाल्या. यातील धोनीने सलग ३ षटकार मारले आणि शेवटच्या चेंडूवर २ धावा केल्या. धोनीमुळेच चेन्नईला २०० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. हे शेवटचे षटक मुंबईसाठी चांगलेच भारी पडले.
इशान किशनने रोहितसोबत फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली पण इशान पाथिराना कडून २३ धावा करत बाद झाला. त्याच षटकात सूर्याही खाते न उघडता बाद झाला. रोहित आणि तिलकने ५० अधिक धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला पण तिलक ३१ धावा करत झेलबाद झाला. पाथिरानाने मुंबईच्या ३ मोठ्या फलंदाजांना बाद केल्याने संघ बॅकफूटवर केला. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या २ धावा करत बाद झाला तर डेव्हिडने सलग दोन षटकार लगावत सर्वांच्या आशा पल्लवित केल्या, पण तो ५ चेंडूत १३ धावा केल्या. तर शेफर्डही १ धावा करत क्लीन बोल्ड झाला. सगळे फलंदाज बाद होत असतानाच रोहित शर्मा एका टोकाला पाय रोवून घट्ट उभा होता, पण इतर फलंदाजांची रोहितला साथ न मिळाल्याने त्याने शतक झळकावूनही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
चेन्नईकडून सामनावीर ठरलेल्या पाथिरानाने ४ षटकांत २८ धावा देत ४ विकेट्स घेतले. तर तुषार देशपांडे आणि शार्दुल ठाकूरने एक एक विकेट मिळवली.
तत्त्पूर्वी नाणेफेक गमावून चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या. चेन्नईने अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र या जोडीला सलामीसाठी धाडले. पण रहाणे एका चौकारासहित पाच धावा करत बाद झाला. त्यानंतर रचिन रवींद्र १६ चेंडूत २१ धावा करत आऊट झाला. ऋतुराजच्या ६९ धावा आणि सातत्याने फॉर्ममध्ये असलेल्या शिवम दुबेच्या ६६ धावांच्या शानदार फटकेबाजीच्या जोरावर संघाने १५० अधिक धावा केल्या. तर मिचेलनेही १४ चेंडूत १७ धावा केल्या. सुरूवातील मुंबईने धावांवर अंकुश ठेवला खरा पण शेवटपर्यंत तो कायम राखण्यात अपयशी ठरले. त्यानंतर धोनीने ५०० च्या स्ट्राईक रेटने ४ चेंडूत अविश्वसनीय २० धावा करत संघाच्या विजयाचा पाया भक्कम केला.
मुंबईकडून हार्दिक पंड्याने ३ षटकांत २ विकेट घेत ४३ धावा दिल्या. तर गेराल्ड कोएत्झी आणि श्रेयस गोपाल यांना १ विकेट मिळाली.